सांगलीत पूरपट्ट्यात पाणी शिरले; स्थलांतर सुरू | पुढारी

सांगलीत पूरपट्ट्यात पाणी शिरले; स्थलांतर सुरू

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी शुक्रवारी रात्री साडेसात वाजता 30 फुटांवर गेली. त्यामुळे पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले. येथील सहा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. दरम्यान पूरपट्ट्यातील नागरिकांनी घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता सुरक्षितस्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

सांगलीत शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पाणी पातळी 29 फूट 3 इंच होती. दुपारी पावणेबारा वाजता 29 फूट 4 इंच, सायंकाळी 5.40 वाजता 29 फूट 8 इंच, सायंकाळी 6.36 वाजता 29 फूट 11 इंच, सायंकाळी 7.39 वाजता 30 फूट 1 इंच होती. पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता शनिवारी पाणी पातळी 33 फुटांपर्यंत जाईल. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळी 35 फुटांपर्यंत जाऊ शकते.

शुक्रवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि नुतन आयुक्त सुनील पवार सांगलीत पूरभागाची पाहणी केली. यावेळी सूर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉट मधील सहा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुराचे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करू नये, असे आवाहनही महापौर व आयुक्तांनी केले.

नुतन आयुक्त पवार यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला आणि लगेचच पूर परिस्थितीची माहिती घेतली. आयुक्त पवार व महापौर सूर्यवंशी यांनी पूरबाधित भागात जाऊन जनतेशी संवाद साधला. तात्पुरता निवारा केंद्राची पाहणी केली. निवारा केंद्रात सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानंतर सूर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉट येथील पूर भागाची पाहणी करीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा सुचना केल्या.

पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने कोणीही कसलाही धोका पत्करू नये. घरापर्यंत पाणी येण्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आलेे. महापालिका प्रशासनाने पूरपट्ट्यात ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करावी आणि पाणी वाढण्यापूर्वी नागरिकांना स्थलांतर करावे, अशा सूचना दिल्या. दरम्यान महापुराचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, असेही पवार यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे, प्रणिल माने उपस्थित होते.

Back to top button