सांगली : भिलवडी भागात भुईमूग, सोयाबीन वाया | पुढारी

सांगली : भिलवडी भागात भुईमूग, सोयाबीन वाया

अंकलखोप; पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यातील भिलवडी, धनगाव, आमणापूर, बुर्ली, अंकलखोप, सुखवाडी, चोपडेवाडी, खटाव, ब्रह्मनाळ या तालुक्यातील सोयाबीन अतिपाण्यामुळे तसेच यलो मोझॅक व्हायरसमुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने पाहणी करून भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

कृष्णा नदीतून पाण्याची सोय असल्याने या भागात बागायती पिकांवर भर आहे. उन्हाळ्यातही सोयाबीन, भुईमूग व अन्य पिके घेतली जातात. यंदा जादा तापमानामुळे सोयाबीन पूर्णपणे वाया गेले. परंतु खरीपमध्ये काहीतरी हाताला लागेल या आशेने शेतकर्‍यांनी सोयाबीनचे 9305 या कमी कालावधीत येणार्‍या वाणाची टोकण मोठ्या प्रमाणात केली. परंतु उन्हाळी हंगामातील सुप्त अवस्थेत गेलेल्या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले. त्यात सलग व जोरदार पावसामुळे शेतात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

तसेच अतिपाण्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच इतर रोग-किडींचा हल्ला सतत होत आहे. विविध औषधांचा मारा करून शेतकर्‍यांनी सोयाबीन व भुईमूग वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण रोग आटोक्यात येत नसल्याने सोयाबीन शेतातच कुजू लागले आहे. काही शेतकर्‍यांनी पीक काढून टाकले आहे.

पण अनेकांना पाण्यामुळे शेतात जाणेही मुश्कील आहे. त्यामुळे पीक काढता येणे मुश्कील बनले आहे. परिणामी उसाची आडसाली लागण करणेही जमणार नसल्याने हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.

Back to top button