सांगली : गटप्रवर्तक, आशांना दर्जा, वेतन द्या | पुढारी

सांगली : गटप्रवर्तक, आशांना दर्जा, वेतन द्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गटप्रवर्तक, आशांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, दर्जा मिळेपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन द्या, अशा विविध मागण्या करीत महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे : चार महिन्यांपासून आशा व गटप्रवर्तकांना लागू असलेले वेतन मिळालेले नाही. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. माने यांना विचारणा केली. त्यानंतर वेतनाच्या बिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सही झालेली आहे. लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

तसेच ज्या कामांचा मोबदला दिला जात नाही, त्या कामांची सक्ती थांबवावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना नवीन वेतनश्रेणी लागू केलेली आहे. गटप्रवर्तक महिला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असूनसुद्धा त्यांना कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन व नियम लागू केले जात नाहीत. तातडीने ते लागू करावेत. संघटनेच्या सहसचिव प्रा. शरयू बडवे, कॉ. विद्या कांबळे, भारती चौगुले, रेखा परीट, माया जाधव, सुवर्णा सातपुते, राधिका राजमाने, सारिका माने, उज्ज्वला पाटील सहभागी झाल्या होत्या.

Back to top button