सांगलीत 56 सिलिंडर जप्‍त | पुढारी

सांगलीत 56 सिलिंडर जप्‍त

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काटामारी करून कमी वजनाच्या गॅस सिलिंडरचा ग्राहकांना पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. याप्रकरणी जयभारत गॅस एजन्सीच्या तीन वितरकांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा विभागाने 56 सिलिंडर जप्त केले.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विजय आप्पासाहेब मोरे, सुनील बिष्णोई व वाहनचालक राम किशन (सर्व रा. सांगली) यांचा समावेश आहे. याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र उन्हाळे (रा. आलदर चौक, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

जयभारत गॅस एजन्सीकडून कमी वजनाचे गॅस सिलिंडर ग्राहकांना पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. ग्राहकांच्या खूप तक्रारी आल्या होत्या. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाने चौकशी केली. विजयनगर येथे रुक्मिणी गार्डनजवळ एजन्सीचे कार्यालय आहे. दि. 9 ऑगस्ट रोजी पुरवठा विभागाने कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. तिथे 56 गॅस सिलिंडर सापडले. सर्व सिलिंडरचे वजन करण्यात आले. त्यावेळी यामध्ये कमी गॅस असल्याचे निष्पन्न झाले.

प्रत्येक सिलिंडरमध्ये कमी गॅस होता. त्यानंतर विभागाने कंपनीचे मिरज येथील गोडाऊन सील केले. याबाबत पुरवठा निरीक्षक अधिकारी रवींद्र उन्हाळे यांनी शुक्रवारी विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तीन गॅस वितरकांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिलिंडरमधील गॅस काढून ते विकत होते, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. संशयितांना अटक केल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button