आटपाडीत विषारी औषध पाजून महिलेचा खून

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा :  आटपाडी येथे मीना बाबासाहेब जावीर (वय ३८ रा.विद्यानगर) या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र बबन पांढरे (३३.रा गोटेवाडी. ता तासगाव) हर्षदा शिवाजी लांडगे (२० रा.साठेनगर आटपाडी) ,योजना दत्तात्रय पाटील (३२ रा.धांडोरमळा) या तीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की राजेंद्र पांढरे यांची तासगांव येथे शुकमनी नांवाची कंपनी आहे. मीना जावीर, हर्षदा लांडगे, योजना पाटील या कंपनीत काम करत होत्या. मीना जावीर ही विद्यानगर येथील शिवाजी लक्ष्मण चव्हाण यांचे भाडयाचे घरात रहात होती. ती राजेंद्र पांढरेकडे पैशाची वारंवार मागणी करायची. कंपनीच्य बैठकीत मीना जावीर ही हर्षदा लांडगे आणि योजना पाटील या दोघींना वारंवार अपमान करत असे. या गोष्टीचा राग मनात धरुन तिन्ही आरोपींनी संगनमत करून मीनाला बियरमध्ये विषारी औषध देवुन तिला संपवायचे ठरवले. तासगांव येथील पांढरेच्या ऑफिसमध्ये २४ जून रोजी हा कट शिजला.

पांढरे ने विषारी औषधाची बाटली हर्षदा लांडगे आणि योजना पाटील यांच्याकडे सोपवली.  या दोघींनी राजेंद्र पांढरेच्या सांगण्यावरून २७ जून २०२२ रोजी रात्री मीना जावीरला बियरमधून लिहोसीन हे विषारी औषध दिले. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्या दोघी घरातून निघुन गेल्या. मीना जावीर ही विषारी औषध प्राशन करून मयत झाली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमर फकीर,पोलीस नाईक प्रमोद रोडे, डी.के.ठोंबरे हे करत आहेत. तपासादरम्यान हा सुनियोजित खून असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचलंत का?

Exit mobile version