अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्यूसेकने विसर्ग; शिरोळ तालुक्याला दिलासा | पुढारी

अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्यूसेकने विसर्ग; शिरोळ तालुक्याला दिलासा

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणे भरत आली आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्याला पुन्हा महापुराची धास्ती लागून राहिली होती. अशातच कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व दारे खुले करून सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे सोडण्यात आले आहे. शिवाय, अलमट्टी येथील धरणातूनही 1 लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कृष्णेत सोडण्यात आल्याने शिरोळ तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उसंत देऊन उन्हाळ्याप्रमाणे कडकडीत ऊन पडत होते. त्यामुळे शेतकर्‍यांना चिंता लागून राहिली होती.अशातच गेल्या दोन दिवसापासून धरण व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राज्यातील सर्व धरणे भरत आली आहेत. शिवाय सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले. त्यामुळे तालुक्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार होती.

सध्या कोयना धरण 78.48 टक्के, चांदोली वारणा 30.53 टक्के तर अलमट्टी 94.46 टक्के भरले आहे. शिवाय अलमट्टीची क्षमता 123.05 इतकी असून आता 116 टीएमसी भरले आहे. हिप्परगी धरणाची 6 टीएमसी क्षमता असून महाराष्ट्रातून 79 हजार 492 क्यूसेक पाणी अलमट्टीकडे जात असून हिप्परगी धरणाचे सर्व दारे उघडल्याने अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

कर्नाटक सरकारकडून दिलासा 

महापूर आलेल्या काळात नेहमी कर्नाटकातील हिप्परगी व अलमट्टी धरणातून पुरेसा विसर्ग केला जात नसल्याने महापुराला सामोरे जावे लागत होते. तर महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटक सरकारला हिप्परगी व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती करावी लागत होती. आता अलमट्टी धरण भरत आल्याने हिप्परगी व अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू केल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी वाढले तरी आता गतीने कर्नाटकात विसर्ग होणार होत असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुंडमुगे यांनी दिली.

Back to top button