राजू शेट्टी चालले आघाडीपासून दूर ? मोर्चाच्या निमित्ताने सरकारवर निशाणा | पुढारी

राजू शेट्टी चालले आघाडीपासून दूर ? मोर्चाच्या निमित्ताने सरकारवर निशाणा

इस्लामपूर : मारुती पाटील

राजू शेट्टी हळूहळू महाविकास आघाडी सरकारपासून दूर जात असल्याची चर्चा आहे. तसेच ते पुन्हा भाजपशी जवळीक साधत लोकसभेसाठी चाचपणी करीत आहेत का, अशीही चर्चा आहे.

महापूर ग्रस्तांच्या मागण्यांसाठी भाजपच्या मदतीने येथे आक्रोश मोर्चा काढून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महापूर येऊन गेला, याला महिना झाला तरीही शासनाने मदत न दिल्याने पूरग्रस्तांमध्ये मोठा असंतोष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. मोर्चाच्या निमित्ताने शेट्टी यांनी पुन्हा भाजपची जवळीक केली आहे. सरकारवर टीका केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्यांना पराभव पत्करावा लागला होता. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदारपद मिळणार होते. मात्र तो निर्णयच अद्याप झालेला नाही.

या मोर्चाच्या निमित्ताने माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार यांची साथ घेत शेट्टी यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच आव्हान दिल्याचीही चर्चा आहे.

त्यामुळे शेट्टी हळूहळू महाविकास आघाडी सरकारपासून दूर जात असल्याची चर्चा आहे. तसेच ते पुन्हा भाजपशी जवळीक साधत लोकसभेसाठी चाचपणी करीत आहेत का, अशीही चर्चा आहे.

शेट्टी पुन्हा भाजपशी जवळीक करू पाहत असले तरी भाजपच्या काही गटांचा त्यांना विरोध होऊ शकतो. कारण पक्षाचा अंतर्गत आदेश असूनही आमदार सदाभाऊ खोत, महाडिक हे मोर्चात सहभागी झाले नव्हते.

यामुळे होती शेट्टी यांची नाराजी…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उसाच्या एफआरपीचे झालेले तुकडे, नियमित कर्जदारांच्या अनुदान योजनेची न झालेली अंमलबजावणी यामुळे शेट्टी आघाडीत असूनही सरकारवर नाराज होते. सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी ते संधीच्या शोधात होते. आता पूरग्रस्तांच्या प्रश्‍नाच्या निमित्ताने त्यांनी महाविकास आघाडी विरोधात आवाज उठविला आहे.

Back to top button