मंत्री जयंत पाटील म्हणाले वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण | पुढारी

मंत्री जयंत पाटील म्हणाले वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण

सांगली : पुढारी वृत्तसेवा

मंत्री जयंत पाटील म्हणाले गरज असेल तिथे व्यक्‍तीला व नेत्याला वापरायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे असे भाजपचे धोरण आहे. त्यामुळेच भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीत परत येण्यास इच्छुक आहेत.

भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मंत्री जयंत पाटील बोलत होते.

मंत्री जयंत पाटील पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, पक्षाच्या द‍ृष्टीने हा आनंदाचा दिवस आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादीमय होईल.

वैभव शिंदे म्हणाले, भाजपमध्ये जाताना प्रसंग वेगळा होता. पटत नसताना गेलो. वैयक्‍तिक स्वार्थासाठी गेलो नाही. तो पक्ष सोडताना कोणीही विचारले नाही. वापरा आणि सोडा असे धोरण असणार्‍या पक्षात राहायचे कशाला? वाळवा तालुक्याची स्थापना आणि एस. टी. डेपो यासाठी प्रवेश केला होता. पक्षासाठी शिंदे घराण्याचे मोठे योगदान आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन पक्ष सोडला होता. आता सर्वांशी विचार करूनच परत आलो आहे. आनंदराव पाटील, झुंजारराव पाटील, प्रकाश रुकडे, प्रशांत पाटील आदिंनीही मनोगत व्यक्त केले.

वाळवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे, जितेंद्र पाटील, भाजपचे पदाधिकारी दीपक थोटे, संकेत पाटील, अमर शेळके यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश घडला.

जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे, देवराज पाटील, विराज शिंदे,आष्ट्याच्या नगराध्यक्ष स्नेहा माळी, विशाल शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button