सांगली : रक्षा विसर्जनाचे नाते जोडले वृक्ष संवर्धनाशी | पुढारी

सांगली : रक्षा विसर्जनाचे नाते जोडले वृक्ष संवर्धनाशी

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस होणारे पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरांना बगल देऊन ऐतवडे बुद्रुक येथील मयत सीताराम चोखा कांबळे यांची रक्षा ही परंपरेप्रमाणे रक्षा पाण्यात न टाकता शेतात खड्डा काढून मुजविण्यात आली आणि त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

कांबळे कुटुंबात आलेल्या दुःखद प्रसंगीदेखील समाजामध्ये दिशा देण्याचा नवा पायंडा शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत गेल्या दहा वर्षांपूर्वी रुजवला. हे कौतुकास्पद आहे, असे सुधीर कांबळे यांनी सांगितले. बहुतांशीवेळा वाहत्या नदी, ओढ्यामध्ये रक्षा विसर्जन करून जलप्रदूषणाचा धोका अंत्यसंस्कार रक्षा विसर्जनाच्या मातीमुळे याआधी वर्षानुवर्षे निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रक्षा विसर्जनानंतर ती रक्षा शेतातील खड्ड्यात मुजवून त्यामध्ये वृक्षारोपणाचा पर्यावरण संतुलनासाठी दिलेला संदेशही मोलाचा ठरणार आहे. या उपक्रमाचा बोध इतरांनी घेऊन प्रदूषण टाळण्याबरोबरच वृक्ष संवर्धनाची कास धरावी, असा संदेश या कांबळे कुटुंबीयांनी दिला. माजी सरपंच मनीषा कांबळे, रवींद्र कांबळे, किरण कांबळे, शोभा कांबळे, सुषमा जाधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले.

पर्यावरणासाठी अनेक उपक्रम राबवा…

गावातील मुलीचं लग्‍न होऊन ती सासरी जाताना तिच्याहस्ते एक झाड लावून त्या झाडाचे संगोपन तिची आठवण म्हणून त्या मुलीच्या आई-वडिलांनी करावी हा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या द‍ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या वाढत्या तापमानावरून ही गोष्ट लक्षात आलीच असेल. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे, हा सगळा जंगलतोडीचा परिणाम आहे. त्यामुळे जेवढी जास्त झाडे आपण लावू तेवढे चांगले आहे आणि पर्यावरणाचा समतोल राहील, ही संकल्पना आपल्या गावात ग्रामस्थांनी, युवकांनी पुढाकार घेऊन राबवावी, असे मत सुधीर कांबळे यांनी व्यक्‍त केले.

Back to top button