सांगली : मिरजेत बिबट्याचे कातडे जप्‍त | पुढारी

सांगली : मिरजेत बिबट्याचे कातडे जप्‍त

मिरज; पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामीण बसस्थानकाजवळ बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. समीर जयवंत नारकर (वय 32, रा. ठाणे, मूळ रा. फणसगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्याचेे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 25 हजार रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील एकजण मिरज ग्रामीण बसस्थानकाजवळ वन्यप्राण्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांना मिळाली होती. त्यानुसार फडणीस व वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने मिरज ग्रामीण बसस्थानकाजवळ सापळा लावला.

नारकर हा प्लास्टिकची मोठी पिशी घेऊन थांबला होता. पोलिस आणि वन विभागाने त्याला पकडले. त्याच्याकडे बिबट्याचे कातडे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याला संबंधित बिबट्याचे कातडे देवगडमधील एका व्यक्तीने दिले असून ते विक्रीसाठी तो सोलापूरकडे निघाला असल्याचे सांगतले. दरम्यान हे कातडे मिरजेत कोणी विकत घेते का, हे पाहण्यासाठी आला असल्याचे तपासात नारकर याने पोलिसांनी सांगितले आहे.

वर्षापूर्वी बिबट्याला मारले?

संबंधित बिबट्या हा वर्षभरापूर्वी मारला असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. या कारवाईमध्ये उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सोमनाथ कचरे, वनपाल तुषार मोरे, वनरक्षक सागर थोरवत यांच्यासह पोलिस आणि वन विभागाने सहभाग घेतला.

Back to top button