सांगली जिल्ह्यात संसर्गजन्य तापाची साथ | पुढारी

सांगली जिल्ह्यात संसर्गजन्य तापाची साथ

सांगली : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात साथींच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, न्युमोनियाचे रुग्ण वाढत आहेत. अनेकजण गंभीर होत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत आहे. बहुतांश दवाखाने रुग्णांच्या गर्दीने हाऊस फुल्ल होत आहेत. स्वाईन फ्लू, कोरोनाचा संसर्गही काहीसा वाढू लागला आहे.

जिल्ह्यात महिनाभर वातावरण पावसाळी आहे. जागोजागी पाणी मोठ्या प्रमाणात साचून दलदल झाली आहे. दिवसभर गरम, थंड असा वातावरणात सतत बदल होत आहे. यामुळे जीवाणू-विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे अनेकांना व्हायरल इन्फेक्शन होत आहे. यात पहिल्या टप्प्यात घशात खवखवते, त्यानंतर तीव्र डोकेदुखी, अंगदुखी सुरू होेते. यानंतर ताप, चक्कर येणे, अंग थरथरणे अशी लक्षणे दिसतात. या दरम्यान खोकला वाढून फुफ्फुसात इन्फेक्शन वाढते.

दोन-तीन इंजेक्शन, गोळ्या घेऊनही आजार आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेकांना न्युमोनिया, डेंग्यू होत आहे. परिणामी काहींना रुग्णालयात अ‍ॅडमीट व्हावे लागत आहे. बालके, महिला, वृध्द यांना लगेच लागण होत आहे. घरात एक रुग्ण असल्यास इतरांनाही याचा प्रादूर्भाव होत आहे.

सलग आठ ते दहा दिवस रुग्ण अशक्तपणामुळे बेजार होऊन जात आहे. तसेच एका रुग्णास बरे होण्यास एक ते दोन हजार रुपये खर्च येत आहे. कुटुंबांतील दोघे-तिघे आजारी पडल्यास किमान पाच ते सात हजार रुपये खर्चाचा भुर्दंड बसत आहे. काहीजण आजार प्राथमिक अवस्थेत असतानाही गोळ्या, औषधे घेत आहेत. ज्यांची प्रतिकार क्षमता चांगली आहे, ते यातून कसेबसे बचावत आहेत.

Back to top button