सांगली महापालिकेची नगरसेवक संख्या ७ ने वाढूण होणार ८५ | पुढारी

सांगली महापालिकेची नगरसेवक संख्या ७ ने वाढूण होणार ८५

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकांच्या नगरसेवक संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची नगरसेवक संख्या 7 ने वाढणार आहे. महापालिकेत निवडून जाणारी एकूण नगरसेवक संख्या 85 होणार आहे. दरम्यान जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान रंगणार आहे.

महानगरपालिकांच्या नगरसेवक संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यानुसार 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत निवडून येणार्‍या नगरसेवकांची संख्या किमान 65, तर कमाल 85 इतकी असेल. तीन लाखापेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त नगरसेवकाची तरतूद करण्यात येईल, अशी सुधारणा करण्यात आली आहे.

दरम्यान, सन 2011 च्या लोकसंख्येनुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 आहे. तीन लाखावर प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त नगरसेवकाची तरतूद होणार आहे. त्यानुसार अतिरिक्त नगरसेवकांची संख्या 13.51 होते. महापालिकेत सध्या निवडून येणारी नगरसेवक संख्या 78 आहे. नवीन सुधारणा व सदस्य (नगरसेवक) संख्येची कमाल मर्यादा पाहता महापालिकेची नगरसेवकसंख्या 85 होईल. सध्याच्या नगरसेवक संख्येत 7 ने भर पडेल.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे. ही निवडणूक वर्षावर येऊन ठेपली आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडत ही प्रक्रिया निवडणूक जाहीर होण्यापूर्वी होईल. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

Back to top button