सांगली : कडेगाव तालुका पर्यटकांना खुणावतोय | पुढारी

सांगली : कडेगाव तालुका पर्यटकांना खुणावतोय

कडेगाव; रजाअली पिरजादे : पावसामुळे कडेगाव तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अतिशय नयनरम्य, डोळ्यांचे पारणे फेडणारा, मनाला सुखद अनुभव देणारा, हा निसर्गाच्या कुशीत वसलेला तालुका पर्यटकांना खुणावतो आहे.

सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत संपूर्ण कडेगाव तालुका वसला आहे. आता पावसाची रिमझिम सुरू आहे. यामुळे तालुक्यात निसर्गसौंदर्य बहरू लागले आहे. तसेच श्रावणामुळे भक्तांची गर्दी वाढली आहे.

तालुक्यात आणि परिसरात देवदेवतांची जुन्या काळातील देवालये अनेक ठिकाणी आहेत. या ठिकाणी विविध देवालयांत भाविकांची गर्दी दिसते. येथील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य जगप्रसिद्ध आहे.

येथे सागरेश्वर देवस्थानही आहे.त्याचबरोबर चौरंगीनाथ मंदिर, लिंगेश्वर मंदिर, महादेव मंदिर अशी अनेक मंदिरे येथे पाहायला मिळतात. अभयारण्यात देवतळे, बालोद्यान, छत्रीबंगला, वेणुविहार तलाव, घोडेबीळ, तरस गुहा, बाणदार, महानगुंड, किर्लोस्कर पॉईंट आदी पर्यटन स्थळे आहेत.

तालुक्यातील मानवनिर्मित सागरेश्वर अभयअरण्यात विविध प्रकारचे प्राणीही आढळतात. यामध्ये प्रामुख्याने तरस, लांडगा, कोल्हा खोकड, साळू, रानमांजर, चितळ, काळवीट, चिंकारा आहेत. तसेच विविध प्रकारचे पक्षी यामध्ये घार, गिधाड, ससाणा, पारवा, ककर, पिंगळा, तांबडा होला, खंड्या सुतार, धनचडी, सुगरळ, बगळा वगैरे आढळतात. तसेच विविध प्रकारच्या वनस्पती, फळांची झाडेही येथे पहावयास
मिळतात.सागरेश्‍वर हे कराड आणि विटा या मार्गावर बरोबर मध्यभागी येते. सागरेश्वर अभयारण्यानंतर कडेपूर येथील डोंगराई देवी म्हणून कडेगावच्या दक्षिणेला उंच डोंगरावर मंदिर आहे. येथून कडेगाव तालुक्याचे विलोभनीय दृश्य पहावयास मिळते.

डोंगराई देवीची वर्षातून तीनवेळा यात्रा भरते. कर्नाटकातील भाविक येथे नव्याच्या पौर्णिमेला येतात. यात्रा करतात. त्याचप्रमाणे येथे श्रावण महिन्यात सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी यात्रा असते. येथे विविध प्रकारची पौराणिक काळातील देवालये आहेत. ही सर्वच पर्यटनस्थळे, देवालये पर्यटक, भाविकांच्या गर्दीने गजबजू लागली आहेत.

कडेगाव तालुका बनले लोकांचे आकर्षणाचे केंद्र

सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ मंदिर, डोंगराई देवी मंदिर यांना शासनाने पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. साहजिकच या सर्वच ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. या विविध कारणांनी आज पर्यटनाच्या नकाशावर कडेगाव तालुका झळकू लागला आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि विविध देव- देवतांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. येथे सध्या पावसामुुळेेे या परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे. त्यामुळे सध्या निसर्गसौंदर्यात एक वेगळे चित्र कडेगाव तालुक्यात पहावयास मिळत असून, लोकांचे आकर्षणाचे ते एक केंद्र बनले आहे.

Back to top button