सांगली : भाजपचा उमेदवार वजनदार की धक्‍कातंत्र | पुढारी

सांगली : भाजपचा उमेदवार वजनदार की धक्‍कातंत्र

सांगली : उद्धव पाटील : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थायी समितीत बहुमत असलेल्या भाजपकडून सभापतीपदासाठी वजनदार उमेदवार दिला जाणार की धक्कातंत्र अवलंबले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची नजर भाजपमधील घडामोडींकडे आहे. दरम्यान, स्थायी समितीतील 8 सदस्यांची मुदत दि. 31 ऑगस्टरोजी संपणार आहे. नवीन सदस्य निवडी दि. 19 ऑगस्ट दरम्यानच्या महासभेत होणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. भाजपचे 9, काँग्रेसचे 4 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीत बहुमतातील भाजपचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम ठेवले होते. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होईल. स्थायी समितीला महापालिकेची तिजोरी मानले जाते. त्याअर्थाने स्थायी समिती सभापतीपद, सदस्यपदही महत्त्वाचे मानले जाते.

स्थायी समितीतील 8 सदस्यांची 2 वर्षांची मुदत दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. विद्यमान सभापती निरंजन आवटी यांची एक वर्षाची मुदतही संपत आहे. त्यामुळे नवीन सदस्य व सभापती निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेची महासभा दि. 19 ऑगस्टदरम्यान होण्याचे संकेत मिळत आहेत. या महासभेत नवीन 8 सदस्यांनी निवड होईल. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे मुदतपूर्व राजीनामे होण्याची शक्यता आहे. त्यांचे राजीनामे झाल्यास नवीन 10 सदस्यांची निवड महासभेत होईल.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे सभापती पदाचा उमेदवार काँग्रेसचा असणार आहे. राज्यातील सत्तांतरेमुळे भाजप पुन्हा वर्चस्व सिद्ध करेल, असे चित्र दिसत आहे. भाजपकडून सभापतीपदासाठी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी सभागृह नेते युवराज बावडेकर यांचे नाव चर्चेत आहे. गजानन आलदार हेही सभापती पदासाठी प्रबळ इच्छुक आहेत.

दरम्यान, भाजपकडून धक्‍कातंत्राचा अवलंब होईल व सभापतीपदासाठी संजय कुलकर्णी यांचे नावही पुढे येऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. एकूणच भाजपचा सभापती पदाचा उमेदवार कोण असणार, उमेदवारीवरून भाजपमधील नाराजीचा लाभ घेता येईल काय, याकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लक्ष असणार आहे.

स्थायी समितीतील भाजपच्या सविता मदने, अनिता व्हनखंडे, गायत्री कल्लोळी, सुनंदा राऊत, संजय यमगर यांची मुदत संपत आहे. या जागांसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, नसीम शेख, सोनाली सागरे, संजय कुलकर्णी, अ‍ॅड. स्वाती शिंदे, अस्मिता सलगर यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसचे करण जामदार, पद्मश्री पाटील या दोन सदस्यांची मुदत संपत आहे. या दोन जागांसाठी काँग्रेसकडून रोहिणी पाटील, शुभांगी साळुंखे, आरती वळवडे, तौफिक शिकलगार इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे मनगू सरगर यांची मुदत संपत आहे. मात्र नर्गीस सय्यद व संगीता हारगे यांचा राजीमाना होईल, अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अतहर नायकवडी, स्वाती पारधी व पवित्रा केरीपाळे यांचे नाव चर्चेत आहे.

Back to top button