सांगली : दुधोंडीत तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू | पुढारी

सांगली : दुधोंडीत तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू

पलूस; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुधोंडी वसंतनगर येथील नागेश सुबराव देशमुख (वय 21) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून तातडीने खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

नागेश याला 21 जुलै रोजी ताप आल्याने दुधोंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची रक्‍ततपासणी केली असता डेंग्यूसद‍ृश आजार झाल्याचा अहवाल आला होता. त्याला त्रास होऊ लागल्याने 22 जुलै रोजी तासगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच दिवशी त्याला सायंकाळी चक्‍कर आल्याने तो बेशुद्ध झाला. 24 जुलै रोजी पुन्हा त्याला सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याची तब्येत गंभीर झाल्याने त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. दि. 31 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.

नागेश याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समजताच आरोग्य विभाग स्वच्छतेच्या कामाला लागला आहे. याबाबत बोलताना तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, आरोग्य विभागाने गावात औषधांची फवारणी करून घ्यावी. तसेच संपूर्ण गावात आरोग्य विभागामार्फत तात्काळ सर्व्हे करण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button