सांगली : रौप्यपदक विजेत्या संकेतला 5 लाखांचे बक्षीस | पुढारी

सांगली : रौप्यपदक विजेत्या संकेतला 5 लाखांचे बक्षीस

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारा सांगलीचा सुपुत्र संकेत सरगर याला महापालिकेकडून 5 लाख तर, खेलो इंडियामध्ये चमकदार कामगिरी करणारी त्याची बहीण काजोल सरगरला 1 लाखाचे बक्षीस आयुक्त नितीन कापडणीस यांनी जाहीर केले. संकेत आणि काजोलला महापालिका दत्तक घेणार आहे. त्यांना दरमहा 10 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली.

महापालिकेचे आयुक्त कापडणीस यांनी मंगळवारी संकेतच्या आई-वडिलांची भेट घेतली. संकेतच्या यशाबद्दल अभिनंदन केले. संकेतशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. आयुक्त कापडणीस यांनी संकेत सरगर याला 5 लाख तर, खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक विजेत्या काजोल सरगरला 1 लाखाचे प्रोत्साहन बक्षीस जाहीर केले. संकेत आणि काजोलला महापालिका दत्तक घेणार असल्याचे सांगितले. दोघांनाही प्रोत्साहन म्हणून दरमहा 10 हजाराची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. यावेळी नगरसेवक मनगु सरगर, संतोष पाटील, मनोज सरगर, संजय कांबळे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, वैभव वाघमारे, नकुल जकाते उपस्थित होते.

संजयनगरमध्ये जीम, प्रशिक्षक

संजयनगर भागात संकेत सरगर आणि काजोल सरगर तसेच अन्य खेळाडुंसाठी अद्यावत जीम व प्रशिक्षक महापालिका उपलब्ध करून देणार आहे, असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

Back to top button