सांगली : कारागृह महानिरीक्षकांना अहवाल सादर | पुढारी

सांगली : कारागृह महानिरीक्षकांना अहवाल सादर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या सुनील राठोड याच्या विजापूर जिल्ह्यातील यळगूड या गावी घरावर छापा टाकण्यात आला. पण तिथेही तो गेला नसल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या वरिष्ठ पथकाने सोमवारी या घटनेची येथे येऊन माहिती घेतली. कैदी पलायन प्रकरणाचा हा अहवाल कारागृह महानिरीक्षकांना सादर करण्यात आला आहे. येत्या एक-दोन दिवसात महानिरीक्षक येथे येणार असल्याचे सांगण्यात आले.

तासगाव येथे जेसीबी चालकाचा खून केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून राठोड कारागृहात बंदी आहे. रविवारी सकाळी सफाईचे काम करण्यासाठी त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. कचरा टाकण्याचा बहाणा करून त्याने दवाखान्याजवळील भिंतीवरून उडी मारून पलायन केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत आहे. एक पथक कर्नाटकात तळ ठोकून आहे. यळगूड या त्याच्या गावातील घरावर छापा टाकला. घरातील लोकांकडे चौकशी केली. तथापि तो घरी गेलाच नसल्याची माहिती मिळाली. त्याच्या अन्य नातेवाईकांची माहिती घेऊन चौकशी केली जात आहे. खुनातील कैद्यांना कारागृहाचा गणवेश दिला जातो. पळून जाताना त्याच्या अंगावर गणवेश होता. आतापर्यंत पोलिसांनी 25 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. पण राठोड दिसत नाही. पूर्वनियोजित कट रचून त्याने पलायन केले असण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयात नेले होते. तेंव्हा भेटण्यासाठी काहीजण आले होते. तिथे पळून जाण्याचा बेत आखला असण्याची शक्यता आहे.

Back to top button