सांगली : बोरगावात जावयावर खुनी हल्‍ला | पुढारी

सांगली : बोरगावात जावयावर खुनी हल्‍ला

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : विवाहितेला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दांडक्याने त्याच्यावर खुनी हल्ला केल्याचा प्रकार बोरगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीनगर परिसरात शनिवारी दुपारी घडला. या खुनी हल्ल्यात विजय तानाजी जाधव (वय 35, रा. शिवाजीनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी विजय यांचे सासरे मधुकर आनंद कवठेकर, सासू राजश्री, मेहुणा प्रशांत (सर्व रा. शिवाजीनगर) यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय यांच्या आई कलाबाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजय हे बोरगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांची सासरवाडी घराशेजारील आहे. विजय व त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादावादी होत होती.

शनिवारी विजय व त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाल्याने त्या माहेरी गेल्या होत्या. दुपारी विजय हे पत्नीला आणण्यासाठी सासरच्या घराकडे गेले होते. त्यावेळी संशयित आणि विजय यांच्यामध्ये वादावादी झाली. तिघांनी विजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रशांत याने लाकडी दांडके विजय यांच्या डोक्यात मारले.

Back to top button