सांगलीत तरुणावर खुनीहल्ला | पुढारी

सांगलीत तरुणावर खुनीहल्ला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून खोतवाडी (ता. मिरज) येथील अभिषेक अजित कांबळे (वय 19) या तरुणावर धारदार हत्याराने खुनीहल्ला करण्यात आला. ‘केडब्ल्यूसी’ कॉलेजमध्ये मंगळवारी भरदिवसा ही घटना घडली.

याप्रकरणी रात्री उशिरा चौघां हल्लेखोरांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत शिंदे, राहुल, सदाशिव व प्रणित (अजून पूर्ण नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ते कॉलेजचे विद्यार्थी आहेत का नाही, याची पोलिस माहिती घेत आहेत. जखमी कांबळे याच्या डोक्यावर, हातावर हत्याराचा वर्मी घाव बसला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 अभिषेक पदवीचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता तो नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला होता. पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्याचा संशयितांबरोबर वाद झाला होता. यातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. संशयितांनी दुपारी अभिषेकला कॉलेजमध्ये गाठले. ‘आपल्यामध्ये झालेले वाद मिटवूया’, असे त्याला सांगितले. त्यानंतर त्याला ‘एनसीसी’ विभागात नेले. त्यांनी त्याला शिवागाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एकाने खिशातील धारदार हत्याराने हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत तो या विभागातून ओरडत बाहेर पडला. हा प्रकार पाहून अन्य विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी करताच संशयित पसार झाले. कॉलेजमध्ये हल्ला झाल्याचे समजताच विश्रामबाग पोलिस दाखल झाले.

Back to top button