सांगलीत चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या | पुढारी

सांगलीत चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस दलात मंगळवारी मोठे बदल झाले. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यांना तातडीने पदभार घेण्याचे आदेशही गेडाम यांनी दिले आहेत.

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील निरीक्षक अजय सिंदकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक सतीश शिंदे यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील मानवी संसाधन विभागातील अभिजित देशमुख यांच्याकडे शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची वाहतूक नियंत्रण शाखेत बदली करण्यात आली आहे.

बदल्या झालेल्या या अधिकार्‍यांनी तातडीने पदभार स्वीकारून अहवाल सादर करण्याचा आदेश गेडाम यांनी दिला आहे. अजय सिंदकर यांची महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती झाली होती. त्यांनी कोल्हापूरला बदली करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांची बदली झाली आहे. त्यांना लगेच कार्यमुक्तही करण्यात आले आहे. सिंदकर यांची जिल्ह्यात सहा वर्षे सेवा झाली आहे. तासगाव व शहर पोलिस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली.

मुकुंद कुलकर्णी यापूर्वी सांगलीच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून होते. त्यानंतर त्यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली. त्यानंतर आता त्यांची वाहतूक शाखेत नियुक्ती झाली आहे. पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाचा त्यांनी तपास केला होता. अभिजित देशमुख यांची विश्रामबाग, मिरज वाहतूक शाखेत सेवा झाली आहे. येत्या एक-दोन दिवसात आणखी काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

Back to top button