सांगली : शिराळ्यात नागपंचमी उत्साहात साजरी | पुढारी

सांगली : शिराळ्यात नागपंचमी उत्साहात साजरी

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शेकडो वर्षांची परपंरा असणारा शिराळ्याचा जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात उत्साहात पार पडला. घरोघरी मातीचे नाग व प्रतिमेची पूजा करण्यात येत होते. अलोट उत्साहात नाग प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नागमंडळांचे कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन मिरवणुकीने अंबामाता मंदिरात पोहोचले. प्रत्येक घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने मातीच्या नागाची, लाह्या, दुर्वा, कापसाचे वस्त्रासह पूजा केली.

पांडुरंग व प्रमोद महाजन यांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी मानकरी कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी उपस्थित होते. यावेळी मानाचा नागराज मुखवटा आणि मानाचा सराफ यांनी दिलेल्या नाग प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाग प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. कार्यकर्ते ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या घोषणा देत होते. मिरवणुकीवेळी नागमंडळाच्या गाड्यांबरोबर पोलिस अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी यांचा फौजफाटा होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.

उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या 125 अधिकार्‍यांसह कर्मचारी नियुक्त केले होते. ठिकठिकाणी प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत होते. एक पोलिस उप अधीक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 60 महिला अंमलदार, 44 वाहतूक पोलिस कर्मचारी, 330 पोलिस पुरुष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मिरवणूक मार्ग व मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यात्रेनिमित्त शिराळा आगाराने 49 एस. टी. बसेसची सोय केली होती. आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 7 वैद्यकीय व 32 फिरती वैद्यकीय पथके ठेवली होती. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने ठिकठिकाणी पथके नेमली होती. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारल्या होत्या.

शिराळ्याचे प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.

नागपंचमी उत्सवास, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपा नेते सत्यजित देशमुख, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, गौतम पोटे, माजी. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, विश्वासचे संचालक विश्वास कदम, विश्वप्रतापसिंग नाईक, महाडिक युवा शक्तीचे केदार नलवडे, सत्यजित नाईक, पृथ्वीसिंग नाईक आदींनी भेट दिली.

Back to top button