सांगली : ‘नागपंचमी’साठी शिराळानगरी सज्ज | पुढारी

सांगली : ‘नागपंचमी’साठी शिराळानगरी सज्ज

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा येथे साजर्‍या होणार्‍या नागपंचमी उत्सवाची सर्वस्तरावर जय्यत तयारी झाली आहे. यात्रा सुरळीत पार पडावी, या करिता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिस बंदोबस्तात 1 पोलिस उपअधीक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 512 पोलिस कर्मचारी, 60 महिला पोलिस अंमलदार, 44 वाहतूक पोलिस कर्मचारी, 330 पुरुष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅमेरामन, 12 ध्वनी मापक यंत्र, इत्यादींचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, अंबामता मंदिर परिसर, मिरवणूक मार्ग या ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे, 4 वाच टॉवर ठेवण्यात आले आहेत. 16 व्हिडिओ कॅमेरेद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून एसटी बसस्थानक, व्यापारी हॉल, पाडळी नाका, लक्ष्मी चौक, शनिमंदिर, समाज मंदिर, नायकूडपुरा आदी सात ठिकाणी आरोग्य पथके तसेच अत्यावश्यक बाबीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्यावत ठेवण्यात आल्या आहेत.

शिराळा नगरपंचयातीने पाणी, आरोग्य, विद्युत पुरवठा, स्वच्छता याची दक्षता घेतली आहे. वनविभागाचे 125 अधिकारी, कर्मचारी तसेच 10 गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकात 8 जणांची नियुक्ती केली आहे. तसेच 7 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शहरातील 32 गल्ल्यांवर पथकांचे लक्ष राहणार आहे.

प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यातून नामांकित बँड, बेंजो आदीसह पारंपरिक वाद्ये दाखल झाली आहेत. एकूणच शिराळ्याचे वातावरण भक्तिमय झाले आहे.

Back to top button