सांगली : भाजपा-बाबरसेना यांच्यात रंगणार सामना; आटपाडीतील चित्र | पुढारी

सांगली : भाजपा-बाबरसेना यांच्यात रंगणार सामना; आटपाडीतील चित्र

आटपाडी; प्रशांत भंडारे : आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. जिल्हा परिषदेचा एक गट वाढला आहे. पाच जिल्हा परिषद गटांपैकी फक्त करगणी गट खुला आहे. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघात राजकीय घमासान रंगण्याचीच अधिक शक्यता आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेचे पूर्वी चार गट होते. नव्याने झालेल्या मतदारसंघ पुनर्ररचनेमुळे मतदारसंघाची झालेली फाटाफूट नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. गटातून काही गावे कमी झाली आहेत. तर काही गावे गटात समाविष्ट झाली आहेत. नव्याने निर्माण केलेले गट, गण व आरक्षण यामुळे राजकीय आडाखे सध्या बांधणे अवघड झाले आहे. त्यामुळे नवीन समीकरणे आटपाडी तालुक्यामध्ये अस्तित्वात येणार आहेत. सन 2017 मधील निवडणुकीत तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाने चार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती 8 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या.

दिघंची गणात राष्ट्रवादी व खरसुंडी गणात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर देशमुख गटाने भाजपात प्रवेश केला. त्यातून तालुका भाजपामय झाला.त्यानंतर आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या.गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्या गटाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजेंद्रअण्णा देशमुख यांना पराभूत करत राजकीय कुरघोडी केली. आजी -माजी आमदारांना पाटील यांनी मोठे आव्हान दिले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात आमदार पडळकर आणि माजी आमदार देशमुख गट यांचा आमदार बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येक जि. प. गटात तिसरे प्रतिस्पर्धी असतील.

आता नव्याने झालेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपचे ब्रम्हानंद पडळकर, जयवंत सरगर आणि बाबर समर्थक बंडू कातूरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. करगणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या मनीषा पाटील यांचा पराभव झाला होता. पराभवाचा हा कलंक पुसण्यासाठी तानाजीराव पाटील मैदानात उतरतील, अशी अपेक्षा आहे. किंवा दत्तात्रय पाटील यांना उमेदवारी मिळेल.

उमेश पाटील, विजयसिंह पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. दिघंची जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रणव गुरव, बाबर समर्थक जहाँगीर तांबोळी, बाळासाहेब होनराव आणि काँग्रेसचे कल्लाप्पा कुटे यांची नावे चर्चेत आहेत. आटपाडी जिल्हा परिषद गटात माजी सरपंच वृषाली पाटील, स्वाती सागर, अनिता पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खरसुंडी गटात अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्याने उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे.

Back to top button