सांगली : योजना शिराळ्यासाठी; फायदा कराडला | पुढारी

सांगली : योजना शिराळ्यासाठी; फायदा कराडला

शिराळा; विठ्ठल नलवडे :  वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना शिराळा तालुक्यातील उत्तर भागाला पाणी मिळावे, यासाठी करण्यात आली. मात्र, आता या योजनेचा लाभ कर्‍हाड तालुक्यातील शेतकर्‍यांना प्रथम मिळू लागला आहे. यासाठी ही योजना तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

शिराळा तालुक्यातील उत्तर भागाला पाणी मिळावे, यासाठी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी सन 1983 मध्ये वाकुर्डे बुद्रुक येथे पाणी परिषद घेतली. तसेच योजनेसाठी किर्लोस्कर कंपनीकडून सर्व्हे केला.

त्याच दरम्यान युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या मागे ते उभे राहिले. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून उत्तर भागाला पाणी मिळावे, ही त्यांची मागणी होती.

पुढे शिवाजीराव नाईक युती शासनाच्याकाळात राज्यमंत्री झाले. त्यावेळी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, त्याच काळात डावा कालवा व वाकुर्डे बुद्रुक योजनेचा संघर्ष विकोपाला गेला होता होता. पण, वाकुर्डे उपसा सिंचन योजनेसाठी शिवाजीराव नाईक, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक, ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख, दिवंगत नेते नानासाहेब महाडिक एकत्र येऊन वाकुर्डेसाठी आग्रही राहिले होते.
आघाडी सरकारच्या काळात मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, काकासाहेब उंडाळकर यांनी पाठपुरावा केला. यातून या योजनेचे बहुतांश काम मार्गी लागले आहे.

मात्र, सध्या तरी या वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचा फायदा कराड तालक्याला मोठ्या प्रमाणात होतो आहे. कराड तालुक्यातील 14 गावांना याचा फायदा झाला आहे. यात येणपे, माटेकरवाडी, येळगाव, गोरेवाडी, घोगाव, महागंगावाडी, आकाईवाडी, शेवाळीवाडी, जिती, साळशिरंबे, खिलारवाडी, माणिकवाडी मणुगाव, नांदगाव या गावातील 2200 हेक्टर क्षेत्रास पाणी मिळणार आहे. यासाठी वाकुर्डेचे पाणी कालवा कि. मी. 0 ते 27 किलोमीटर कालव्यातून खिरवडे येथून उचलून हातेगाव तलावात सोडले आहे. तेथून उचलून ते करमजाई धरणात सोडण्यात आले आहे. तेथून ते कराड तालुक्यातील शेतीला पाणी मिळत आहे. कराड तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदायी ठरली आहे. मात्र, शिराळा उत्तर भागासाठी प्रामुख्याने या योजनेची मागणी झाली, पण या भागातीलच शेतकरी अद्यापही या योजनेचे पाणी शेतात कधी येणार या प्रतीक्षेत आहे. यासाठी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Back to top button