राजू शेट्टी म्हणाले, मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही | पुढारी

राजू शेट्टी म्हणाले, मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा

राजू शेट्टी म्हणाले, मी आघाड्या निर्माण करणार्‍यांपैकी एक आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडीत आहे म्हणजे त्यांचा गुलाम आहे, असे नाही.

जेथे सरकार चुकते आहे, तेथे मी विरोध करणाराच, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी येथे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, भागवत जाधव उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, मी आघाडी सरकारबरोबर आहे म्हणजे त्यांचा गुलाम आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. जेथे सरकार चुकते आहे, तेथे मी विरोध करणारच. यावेळी सरकार चुकलेच आहे. त्यामुळे आम्हाला सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागले आहे.

गेले वर्षभर कोरोनाच्या नावाखाली या सरकारने आमची मुस्कटदाबी केली आहे. आंदोलने, मोर्चे काढू दिले नाहीत. त्यामुळे आता सरकारला त्यांची चूक दाखवून देण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत.

ते म्हणाले, पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने पूरग्रस्तांची चेष्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पुराने घरे व शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने सरकारने तातडीने या मदतीत वाढ करायला हवी.

हे सरकार पूरग्रस्तांना घरे सरकारजमा करा, तुम्हाला भूखंड देतो, असे म्हणून व्यापार करायला लागले आहे.

पूरग्रस्तांना शासनाने कर्जमाफी व यापूर्वी नियमित कर्जदारांना जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम तातडीने द्यावी, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करावी, आदी आमच्या मागण्या आहेत.

Back to top button