सांगली : गुळावरही जीएसटी; अधिसूचनेमुळे संभ्रम दूर | पुढारी

सांगली : गुळावरही जीएसटी; अधिसूचनेमुळे संभ्रम दूर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुळावरील ‘जीएसटी’चा संभ्रम अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेने दूर झाला आहे. दि. 18 जुलैपासून गुळाला 5 टक्के जीएसटी लागू होत आहे. पॅकिंगमधील दही, ताक, लस्सी, अन्नधान्य, डाळीवरही 5 टक्के जीएसटी लागू होत आहे. मात्र याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

आत्तापर्यंत अन-ब्रँडेड किंवा ब्रँडवरील अधिकार सोडून दिलेले खाद्यपदार्थ, धान्य इत्यादींवर जीएसटी सवलत दिली जात होती. जीएसटी परिषदेच्या 47 व्या बैठकीमध्ये त्यात सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे प्री-पॅकेज आणि प्री-लेबल केलेले विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य यांना सवलतीमधून वगळण्यासाठी शिफारस केली होती. प्री-पॅक केलेले, प्री-लेबल केलेले दही, लस्सी आणि ताक यांचीही सवलत मागे घेण्यात आली. त्यामुळे आता पूर्व पॅकिंग व पूर्व लेबल लावलेल्या अन्नधान्य आदी वस्तू पुरवठा करताना किरकोळ पॅकवर दि. 18 जुलैपासून 5 टक्के जीएसटी लागू होत आहे.

जीएसटीच्या सवलतीच्या शेड्युलमध्ये गुळाचा समावेश होता. मात्र गूळ हा 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 5 किलो पॅकिंगमध्ये
बाजारात विक्रीला येतो. त्यामुळे आता गुळालाही 5 टक्के जीएसटी लागणार आहे.

संबंधित व्यापार शनिवारी बंद : शरद शहा

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, गुरुवारी मुंबईत सर्व व्यापारी संघटनांची बैठक झाली आहे. गूळ, दही, ताक, लस्सी तसेच अन्नधान्यांवर लागू केलेल्या 5 टक्के जीएसटीच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 16) संबंधित वस्तुंचा देशव्यापी व्यापार बंद राहणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा विचारही व्यापारी संघटनांच्या बैठकीतून पुढे आला आहे.

यांना सवलत

  • 25 किलो किंवा त्याहून जास्त प्रमाणात असलेल्या पॅकेजमधील वस्तू ज्याचा ‘ब्रँड’चा क्लेम सोडून दिला आहे.
  • सुटे विकले जाणारे विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य
  • ज्याचे पॅकिंगवर चिन्ह /खूण नाही असे खाद्य पदार्थ, धान्य
  • ग्राहकासमोर त्याने सांगितल्याप्रमाणे केलेल्या पॅकिंगमधील वस्तू
  • अनोंदणीकृत ब्रँड वस्तू ज्या पूर्व पॅकिंग वस्तू व पूर्व लेबल लावलेल्या लीगल मेट्रोलॉजी कायद्याच्याच्या कक्षेत येत नाहीत.

Back to top button