म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिकाला आज न्यायालयात हजर करणार | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिकाला आज न्यायालयात हजर करणार

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबियांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेला मांत्रिक आब्बास बागवान आणि त्याचा साथीदार धीरज सुरवशे या दोघांची सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गुप्तधन शोधून देण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी वनमोरे कुटुंबियाकडून तगादा लावण्यात आला होता. त्या तगाद्याला वैतागून मांत्रिक बागवान याने हे हत्याकांड केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी बागवान आणि सुरवशे या दोघांची कोठडी पोलिसांनी वाढवून घेतली होती. त्याची मुदत आज संपणार आहे.

साखळी पद्धतीने विषारी गोळ्या मिळवून हे हत्याकांड केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याने गुप्तधन शोधण्यासाठी आणलेली भांडी ज्या दुकानात विकली तो दुकानदार, विषारी द्रव देण्यासाठी ज्या ठिकाणाहून 9 बाटल्या विकत घेतल्या तो दुकानदार आणि बनावट नंबर प्लेट बनवून देणारा दुकानदार अशा तिघांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, बागवान आणि सुरवशे या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काही जणांना जामीन मंजूर

वनमोरे कुटुंबियाने सुरुवातीला सावकारी पाशातून आत्महत्या केली, असे चित्र निर्माण झाले होते. वनमोरे कुटुंबियाकडे सापडलेल्या चिठ्ठीत 25 जणांची नावे लिहिण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 19 जणांना अटक केली होती. काही जणांनी सावकारी पद्धतीने व्याज घेऊन कर्ज दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही जणांनी हातउसणे आणि मदतीसाठी पैसे दिल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यामुळे काही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Back to top button