सांगली : जिल्ह्यातील 200 भाविक अमरनाथकड | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील 200 भाविक अमरनाथकड

सांगली :  पुढारी वृत्तसेवा ; अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीच्या आपत्तीमधून भाविक बचावले असले तरी अजूनही तिथे पाऊस सुरूच आहे. दोन दिवस तेथील दर्शन बंद ठेवण्यात आल्याने राज्यातील विविध शहरातील दोनशे भाविक रविवारी दर्शन न घेताच परत निघाले आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यातून नव्याने दोनशे भाविक रवाना झाले आहेत. गुहेजवळ झालेल्या ढगफुटीतून सांगली व बेळगावचे दोन भाविक बचावले होते. अनेक भाविक याठिकाणी होते. प्रसंगावधान राखल्याने ते या आपत्तीमधून बचावले.

अजूनही तिथे मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने अमरनाथ यात्रा गेल्या दोन दिवसांपासून स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे एक हजारहून अधिक भाविक परतीच्या मार्गावर आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे. सांगलीसह राज्यातील विविध शहरातील भाविकांचे नातेवाईक मोबाईलवर संपर्क साधून माहिती घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आहेत. रविवारी जिल्ह्यातील आणखी दोनशे भाविक दर्शनासाठी निघाले आहेत. रेल्वेला त्यांनी बुकिंग केले आहे. तिथे जाईपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल, असा निर्णय घेऊन ते गेले आहेत. 21 जुलैपर्यंत सुमारे दोन हजार दोनशे भाविक जाणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे किती भाविक गेले? किती परत येत आहेत? याची कोणतीची नोंद नाही.

कवलापुरातील 40 भाविकांचे वैष्णवी देवी दर्शन

कवलापूर (ता. मिरज) येथील भूषण गुरव यांच्यासह 40 भाविक अमरनाथला गेले आहेत. त्यांचे दर्शन झाले आहे. रविवारी त्यांनी वैष्णवी देवीचे दर्शन घेतले होते. येत्या एक दोन-दिवसात ते सांगलीला येण्यासाठी रवाना होणार
आहेत, असे गुरव यांनी सांगितले.

डोंगरसोनीतील 50 जणांचा ग्रुप निघाला
डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील 50 जणांचा ग्रुपही अमरनाथला गेला आहे. पण ती उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना दर्शन घेता आले नाही. जिल्ह्यातील भाविक रविवारी भेटले. पाऊस थांबत नसल्याने ते दर्शन न घेता निघाले असल्याचे काही भाविकांनी सांगितले.

Back to top button