सांगली : वाळवा तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदारसंघनिहाय आरक्षण सोडत बुधवार, दि. 13 रोजी निघणार आहे. या सोडतीकडे वाळवा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती मतदारसंघ पुनर्रचनेत वाळवा तालुक्यातील कामेरी व येलूर हे जुने मतदारसंघच रद्द करण्यात आले. तर बहादूरवाडी, कुरळप, नेर्ले हे नवे मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत. तालुक्यात जि. प. चे 11 चे 12 मतदारसंघ तर पंचायत समितीचे 22 चे 24 गण झाले आहेत. जुन्या सर्व मतदारसंघात फेरबदल करून नवे मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत. येलूर व कामेरी हे मतदारसंघ रद्द करून कामेरीचा पेठ तर येलूरचा चिकुर्डे मतदारसंघात समावेश केला आहे. येलूर, बावची या मतदारसंघातील काही गावांचा नवा बहादूरवाडी तर कामेरी, चिकुर्डे मतदारसंघातील काही गावे घेऊन कुरळप व कासेगाव, पेठ मतदारसंघातील काही गावांचा समावेश करून नेर्ले हे तीन मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आता बुधवारी आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हा परिषदेत तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयात होणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व विकास आघाडीनेही तयारी सुरू केली आहे. आरक्षण सोडतीनंतर मोर्चेबांधणीला खरा वेग येणार आहे.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेची मागणी

जिल्हा परिषद मतदारसंघांची पुनर्रचना करताना काहींनी सोयीची पुनर्रचना केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पुनर्रचनेवर आक्षेपही घेण्यात आले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्याने मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना करण्याची मागणी भाजप व शिवसेेनेकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button