सांगली : धरण परिसरात पाऊस सुरूच | पुढारी

सांगली : धरण परिसरात पाऊस सुरूच

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगलीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी आणि कोयना, चांदोली, धोम, कण्हेर, नवजा, महाबळेश्‍वर या परिसरात पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढू लागला आहे. त्याशिवाय कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होत आहे.पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला. पलूस तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मीँ पाऊस पडला.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 6.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज 3.5 : (98.3),जत : 1.1 (95.8), खानापूर-विटा : 3.6 (92.3), वाळवा-इस्लामपूर : 8 (98.9), तासगाव : 5.6 (80.5), शिराळा : 21.8 (250.6), आटपाडी : 2.1 (70.5), कवठेमहांकाळ : 2.7 (83.5), पलूस : 6.6 (60.7), कडेगाव :6.2 (80.3).

दरम्यान, धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. कोयना धरण परिसरात बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 103 तर गुरुवारी दिवसभर म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत 47 मिमी पाऊस पडला. महाबळेश्‍वर येथे वरीलप्रमाणे अनुक्रमे 147 व 75 मिमी पाऊस झाला. नवजाला वरीलप्रमाणे 162 व 50 मिमी पाऊस पडला. गेल्या चार दिवसांपासून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. कोयनेतील पाणीसाठा 21.72 टीएमसी झाला आहे.

धोमला 29 व कण्हेरला 15 मिमी पाऊस पडला. धोम धरणात 4.20 (13.50), कण्हेरमध्ये 2.59 (10.10) पाणीसाठा झाला आहे. सध्या चांदोलीतून 703 आणि कण्हेर मधून 24 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत काहीशी वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 57.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस थांबल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र सोमवारपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Back to top button