रस्त्यांचे काँक्रिटीकरण; पण घरे, दुकाने खुजी | पुढारी

रस्त्यांचे काँक्रिटीकरण; पण घरे, दुकाने खुजी

इस्लामपूर : सुनील माने

शहरात प्रवेश करणार्‍या तीन मोठ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम गतीने सुरू आहे. हे रस्ते उंच झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने, पानटपर्‍या, छोटे व्यावसायिक तसेच अनेक घरांना पावसाच्या पाण्याचा फटका बसणार आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा ते पेठ-सांगली रोड, राजारामबापू कारखाना ते इस्लामपूर तहसील कचेरी, इस्लामपूर एमआयडीसी ते तहसील कचेरी असे या मोठ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या रस्त्यांमुळे शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.

तहसील कचेरीपासून कारखान्यापर्यंत झालेल्या काँक्रिटीकरण रस्त्यामुळे एका बाजूला वाहतूक सुरळीत झाली. पण, दुसर्‍या बाजूने रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकाने, पानटपर्‍या, घरे आहेत. गटारींची अवस्था दयनीय आहे. गटारींची उंची कमी आहे. मोठ्या पावसात ही गटारी तुडुंब भरून वाहतात. आता रस्ते उंच झाल्यामुळे सर्व पाणी घरे, दुकान, पानटपर्‍यांमध्ये शिरणार आहे. पालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये असणार्‍या तळघरातील गाळ्यांनाही पावसाळ्यात मोठा फटका बसणार आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण काम सुरू आहे. अनेक ठिकाणचे काम अर्धवट झाले आहे. आता तर पावसाळा सुरू झाला. त्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडणार आहे. शहरातील गांधी चौक ते बस स्टॅण्ड रोड, जुनी भाजी मंडई ते गांधी चौक, यल्‍लामा चौक, मोमीन मोहल्‍ला आदी ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले आहेत.

Back to top button