इस्लामपूर : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समवेत | पुढारी

इस्लामपूर : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समवेत

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी व सांगली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सांगितले. मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शिवसेना पक्षाचा राजीनामाही देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. परंतु सध्या आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जत तालुक्यातील 63 गावांचा पाणीप्रश्‍न, शिराळा, पलूस, कडेगाव, आष्टा शहरातील विविध प्रश्‍न तसेच इस्लामपूरच्या नामांतरणाचा व शहरातील विकासकामांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे लक्ष घालतील, अशी आशा आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी असूनसुद्धा शिवसेनेवर प्रचंड अन्याय झाला आहे. त्यामुळे या अभद्र आघाडी विरोधात एकनाथ शिंदे यांनी आवाज उठविल्यामुळे त्यांना यापूर्वीच समर्थन दिले आहे. त्यांच्यासोबत गेल्याने शिवसैनिकांना न्याय मिळणार आहे व त्यांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

Back to top button