म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाला विषारी गोळ्या पुरविणार्‍यांचे ’रॅकेट’ | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाला विषारी गोळ्या पुरविणार्‍यांचे ’रॅकेट’

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबियांवर विषप्रयोग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विषारी गोळ्या पुरविणार्‍यांची साखळी आता समोर आली आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. अन्य तिघांकडे कसून चौकशी सुरू असून साखळी पद्धतीने विषारी गोळ्या पुरविण्यात आले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मांत्रिक आब्बास बागवान याला विषारी गोळ्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी पोलिसांनी मनोज चंद्रकांत शिरसागर याला पुण्यातून अटक केली आहे. शिरसागर याला विषारी गोळ्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी पोलिसांनी शहा, लक्ष्मीकांत हजरा आणि अशपाक मुन्शी यांना देखील पुण्यातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर साखळी पद्धतीने विषारी गोळ्या मांत्रिका पर्यंत पोहोच केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या शहा नामक व्यक्तीची पुण्यात सराफी दुकानांना लागणार्‍या हातोडी आणि छिन्नी तयार करणारी शहा अँड कंपनी आहे. लक्ष्मीकांत हजरा याचा गलाई व्यवसाय आहे. अष्पाक मुन्शी याचे जुनी नाणी व नोटा विक्रीचा व्यवसाय आहे. वरील सर्वांचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीतून शहा याने विषारी गोळ्या लक्ष्मीकांत हजरा याला दिल्या होत्या. हजरा याने त्या गोळ्या मुन्शी याच्याकडे दिल्या. मुन्शी याने मनोज शिरसागर यांच्याकडे दिल्या होत्या. त्यानंतर शिरसागर याने त्या विषारी गोळ्या मांत्रिकाला दिल्या होत्या.

मनोज शिरसागर यांच्याकडून घेतलेल्या विषारी गोळ्यांची पूड करून मांत्रिकाने विषप्रयोग करून वनमोरे कुटुंबियांची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर मांत्रिक बागवान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मांत्रिकाने शिरसागर याच्याकडून विषारी गोळ्या विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या अटकेनंतर मांत्रिकाला विषारी गोळ्या पुरवठा करणार्‍या रॅकेटचा आता पर्दाफाश झाला आहे.
एकमेकांच्या ओळखीतून विषारी गोळ्यांचा पुरवठा झाला आहे. शहा, हजरा आणि मुन्शी यांनी केवळ गोळ्या पुरवठा करण्याचे काम केले होते. त्यांनी पुरवठा केलेल्या गोळ्यांचा खून करण्यासाठी विषप्रयोग केला जाणार असल्याची माहिती नव्हती, असे त्यांनी पोलिस चौकशीत सांगितले आहे. परंतु मनोज शिरसागर याला मात्र विषारी गोळ्या वनमोरे कुटुंबियांवर विषप्रयोग करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती होती. असे देखील तपासात आता समोर आले आहे. तिघा संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पथक पुन्हा सोलापूरकडे रवाना

मांत्रिक बागवान याच्या घरी अन्य काही धागेदोरे मिळतात का? तसेच त्याने यापूर्वी काही कारनामे केले होते का, असा तपास देखील करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक सोलापूरकडे गेले असून मांत्रिक राहत असलेल्या त्याच्या बहिणीच्या घराशेजारी, मांत्रिकाच्या संपर्कात असणार्‍यांकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

12 गोळ्यांसाठी मोजले 60 हजार

मांत्रिक बागवान याने विषप्रयोग करण्यासाठी शिरसागर याच्याकडून विषारी गोळ्या घेतल्या आहेत. 12 विषारी गोळ्या घेण्यासाठी मांत्रिक बागवान याने 60 हजार रुपये मोजले होते. शहा अँड कंपनीचे शहा यांनी त्या गोळ्या कुठून आणल्या. गोळ्या बनवणारी कंपनी कोणती? याचा तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी आणखीन मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Back to top button