म्हैसाळ हत्याकांड : विषारी गोळ्या देणार्‍यास अखेर बेड्या | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड : विषारी गोळ्या देणार्‍यास अखेर बेड्या

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबीयांचे हत्याकांड करण्यासाठी मांत्रिकाला विषारी गोळ्या देणार्‍याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. मनोज चंद्रकांत शिरसागर (वय 48, सध्या रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मूळ गाव सोलापूर) असे त्याचे नावे आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुप्तधनासाठी मांत्रिक आब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबीयांकडे पैसे घेतले होते. गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे कुटुंबीयाने पैसे परत देण्यासाठी मांत्रिकाकडे तगादा लावला होता. कायमची कटकट मिटविण्यासाठी मांत्रिक बागवान याने विषारी गोळ्यांचा विषप्रयोग करून हत्याकांड केले होते.

विषारी गोळ्या देणारा आणि ती बनविणार्‍या कंपनीच्या मागावर पोलिस होते. तपास करीत असताना गोळ्या देणारे संशयित पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, भगवान पालवे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके करून पुण्याला रवाना करण्यात आली. यावेळी तळेगाव दाभाडे येथे छापा टाकून मनोज शिरसागर याच्यासह चौघांना ताब्यात घेतले होते. चौघांकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी मनोज शिरसागर यानेच मांत्रिक बागवान याला विषारी गोळ्या पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करून त्याच्यावर खुनाचे कलम लावण्यात आले आहे.

शिरसागर याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. शिरसागर याची व मांत्रिकाची कधीपासून ओळख आहे. त्याने ‘त्या’ विषारी गोळ्या कोठून आणल्या, गोळ्या कोणत्या कंपनीत तयार करण्यात आल्या, त्या गोळ्या मांत्रिकाला कधी व किती दिल्या, त्याने अन्य कोणाला विषारी गोळ्या दिल्या आहेत का, वनमोरे कुटुंबीयांवर विषप्रयोग करणार असल्याची माहिती शिरसागर याला होती का, याचा कसून तपास पोलिस करणार आहे. त्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे शिरसागरला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी दिली. मनोज शिरसागर याच्यासोबत अन्य तिघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आहे आहे. विषारी गोळ्या तयार करण्यामध्ये आणि त्याचा पुरवठा करण्यामध्ये तिघांचा कितपत सहभाग आहे, याचा देखील पोलिस तपास करीत
आहेत.

दरम्यान, मांत्रिक आब्बास बागवान आणि त्याचा साथीदार धीरज सुरवशे यांची गुरुवारी पोलिस कोठडी संपणार आहे. मांत्रिकाकडे या गुन्ह्याबाबत अजून सखोल चौकशी करायची असल्याने त्याची पोलिस कोठडी वाढवून मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विषारी गोळ्या देणारा प्लॉट एजंट?

मनोज शिरसागर याने मांत्रिक बागवान याला गोळ्या दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तो मूळचा सोलापूरचा असून गेल्या अनेक वर्षापासून तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे वास्तव्यास आहे. शिरसागर हा पुण्यात प्लॉटची एजंटगिरी करतो. तो सोलापूरचा असल्याने मांत्रिक आब्बास बागवान याचा मित्र आहे. ओळखीतूनच त्याने मांत्रिक बागवान याला विषारी गोळ्या दिल्या होत्या. परंतु त्याने ‘त्या’ कोठून आणल्या आणि गोळ्या बनविणारी कंपनी कोणती याची चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे.

Back to top button