सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून | पुढारी

सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने दिलीप प्रभाकर शिरगूरकर (वय 41, रा. ऐंशी फुटी रस्ता, विश्रामबाग, सांगली) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या सहा तासांत खुनाचा छडा लावून हल्लेखोर धनराज गजानन राऊत (वय 26, रा. श्रीराम निवास, दत्तनगर, विश्रामबाग) याला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. घटनास्थळावरून हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला रक्ताने माखलेला दगड जप्त करण्यात आला आहे.

शिरगूरकर मूळचे कर्नाटकातील रायबागचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते पत्नी व मुलीसमवेत ऐंशी फुटी रस्त्यावर राहात होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दररोज ते दारू पिऊन घरी येत असत. ते प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. रविवारी सायंकाळी ते घरातून बाहेर पडले होते. तेथून ते धनराज राऊत याच्यासोबत विश्रामबाग परिसरात एका परमिट रूम बिअर बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते.

दारू प्यायल्यानंतर दोघेही ऐंशी फुटी रस्त्यावर आले. तेथील एका मोकळ्या जागेत दोघेही बोलत बसले. बोलता-बोलता त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून शिरगूरकर यांनी राऊतला शिवीगाळ केली. याचा राऊतला राग आला. त्याने शिरगूरकर यांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे त्यांच्यातील हाणामारी वाढत गेली. राऊतने दगड घेऊन शिरगूरकर यांच्या डोक्यात घातला. ते रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळले. त्यानंतर राऊतने तीन ते चारवेळा त्याच दगडाने शिरगूरकर यांचे डोके ठेचले. यामध्ये ते जागीच मरण पावले. त्यानंतर राऊत तेथून पळून गेला.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ‘मॉर्निंग वॉक’ला लोक निघाले होते. त्यांना शिरगुरकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तेथून रक्ताने माखलेला दगड जप्त केला.

शिरगुरकर घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर राहत होते. या घटनेची माहिती समजताच त्यांची पत्नी व मुलगी आक्रोश करीतच आली. रविवारी सायंकाळी शिरगुरकर राऊतसोबत गेले होते, अशी माहिती मिळताच पोलिसांनी राऊतला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबूली दिली. नशेत झालेल्या वादातून त्यांचा खून केला असल्याची राऊतने सांगितले आहे. त्याला मंगळवार दि. 5 जुलै रोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

Back to top button