सांगली : शिक्षक बँकेसाठी चुरशीने 97 टक्के मतदान | पुढारी

सांगली : शिक्षक बँकेसाठी चुरशीने 97 टक्के मतदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी रविवारी चुरशीने 97 टक्के मतदान झाले. मतमोजणी मंगळवारी (दि. 5) मिरज येथे मार्केट यार्डमधील शेतकरी भवनमध्ये सकाळी होणार आहे. दरम्यान, मतदानानंतर सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.

निवडणूक सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळ व विरोधी स्वाभिमानी शिक्षक मंडळ पॅनेलमध्ये दुरंगी झाली. निवडणुकीसाठी 295 कर्मचार्‍यांची निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीसाठी 136 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत 92 जणांनी माघार घेतल्याने 44 जण रिंगणात होते. यामध्ये सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळाच्या पॅनेलचे 21, विरोधी स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनेलचे 21 तर दोन अपक्ष निवडणुकीच्या मैदानात भवितव्य अजमावत आहेत. शिक्षक समिती पुरस्कृत सत्ताधारी पुरोगामी पॅनेलला माजी आमदार स्व. शि.द.पाटील (माधवराव पाटील) यांच्या शिक्षक संघाच्या गटाबरोबर शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य उर्दू संघटना, शिक्षक सहकार संघटनेने पाठिंबा दिला आहे. तर विरोधी शिक्षक संघ (थोरात गट) पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक मंडळाला संघाच्या शि.द.पाटील (धैर्यशील पाटील) गटासह जुनी पेन्शन संघटना, आदर्श शिक्षक समिती, दिव्यांग कर्मचारी शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक भारती संघटनेसह बारा संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.

निवडणूक समितीच्या प्रतिष्ठेची तर शिक्षक संघाच्या अस्तित्वाची असणार आहे. सांगली जिल्ह्यात 26 मतदान केंद्रे तर, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, कुर्डूवाडी या ठिकाणी 8 अशी एकूण 34 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीसाठी 300 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, सत्ताधारी गटाचे नेते विश्वनाथ मिरजकर आणि विरोधी गटाचे नेते विनायकराव शिंदे या दोघांनीही आमचाच विजय होणार, असा दावा केला आहे.

दोन ते तीन तासात लागणार सर्व निकाल

शिक्षक बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 5) सकाळी आठ वाजल्यापासून मिरज बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवनमध्ये होणार आहे. अंदाजे दोन ते तीन तासात निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

Back to top button