जत : हॉटेल कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

जत : हॉटेल कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

जत; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका हॉटेलमधील कामगाराने मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करणार असल्याचे सांगत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण व्हिडीओ कॉल केलेल्या त्या मित्राने तातडीने घर गाठत आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या मित्राला वाचविले.

याबाबतची माहिती अशी, जत शहरातील हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करणारा तरुण हा काही दिवसांपासून निराश होता. तो आपल्या जवळच्या मित्राला मी आत्महत्या करणार असल्याचे सतत सांगत असे. नैराश्येतून तो तसे म्हणत असल्याचे समजून त्याच्या मित्राने त्याकडे अधिक लक्ष दिले नाही. शनिवारी सुट्टी असल्याने तो तरुण हॉटेलमध्ये कामास गेला नाही. दुपारी जेवण करून तरुणाने मित्राला व्हिडीओ कॉल केला. मी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मित्राला सांगितले. त्या मित्राला काहीकाळ काही समजेनासे झाले. त्याने तातडीने त्या मित्राचे घर गाठले, तोपर्यंत त्याने घरच्या तुळईला टीव्हीच्या केबलने गळफास लावून घेतला होता. मित्राने ती केबल तोडून त्याला खाली उतरवले.

तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button