पंजाबमध्ये चोरी : मुख्य संशयिताला अटक; 25 लाखांचे सोने जप्त | पुढारी

पंजाबमध्ये चोरी : मुख्य संशयिताला अटक; 25 लाखांचे सोने जप्त

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : जंडियाला (अमृतसर, पंजाब) येथे झालेल्या 1 कोटी 20 लाखांच्या सोने चोरीप्रकरणी मुख्य संशयित अनिकेत विठ्ठल कदम (वय 20, रा. नरसिंहगाव, ता. कवठेमहांकाळ) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून 25 लाखांचे 501 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड जप्त केली. कवठेमहांकाळ पोलिस व पंजाब पोलिस यांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली. शनिवारी विठ्ठल कदम याला अटक करून त्यांच्याकडून 40 लाखांचे सोने जप्त केले होते. आतापर्यंत एकूण 65 लाखांच्या सोने जप्त केले.
याबाबत माहिती अशी, जंडियाला (अमृतसर, पंजाब) येथील एका सराफ दुकानात अनिकेत कामाला होता. या दुकानातून जानेवारी 2022 मध्ये सुमारे 1 कोटी 20 लाखांचे सोन्याची चोरी झाली होती. याप्रकरणी जंडियाला पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दुकानातील कामगार अनिकेत याच्यावर चोरीचा संशय व्यक्‍त करण्यात आला होता. याच चोरीच्या तपासासाठी संशयितच्या मूळगावी नरसिंगगाव येथे जंडियाल पोलिस आले होते. त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने नरसिंहगाव येथे छापा टाकून विठ्ठल कदम याला अटक करून त्याच्याकडून 40 लाखांचे सोने जप्त केले होते.

रविवारी पोलिस नाईक अमिरशा फकीर यांना संशयित अनिकेत हा नरसिंहगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी खरे, आमिरशा फकीर, पोलिस अंमलदार विनोद चव्हाण, विठ्ठल सानप, दीपक पवार यांच्या पथकाने नरसिंहगाव येथे संशयित अनिकेत याला अटक केली. त्याच्याकडून 501 ग्रॅम वजनाचे 25 लाखांचे सोन्याची लगड जप्त केली. दोन्हीही संशयिताना पोलिसांनी जंडियाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button