म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाची बहीण, विषारी गोळ्या पुरवठादार रडारवर | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाची बहीण, विषारी गोळ्या पुरवठादार रडारवर

मिरज; पुढारी वृत्तसेवा : गुप्तधन शोधून देण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानेच विषारी गोळ्यांच्या पावडरपासून बनविलेले द्रव्य पाजून मांत्रिकाने 9 जणांचे हत्याकांड केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हत्याकांडामध्ये मांत्रिकाचाच हात असलातरी त्याला विषारी गोळ्या देणारा संबंधित व्यक्ती आणि मांत्रिकाची बहीण असे दोघे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

म्हैसाळ येथील हत्याकांडप्रकरणी तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु गुप्तधनाच्या हव्यासातूनच 9 जणांनी कर्ज घेऊन मांत्रिकाला पैसे दिले होते. गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे हे मांत्रिकाकडे दिलेले पैसे परत मागत होते. पैशांच्या तगाद्यानेच वनमोरे कुटुंबीयांचा जीव गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आब्बास बागवान हा मांत्रिक त्याच्या सोलापूर येथील बहिणीच्या घरी राहत होता. त्या ठिकाणी पोलिसांना धागा बांधलेला नारळ, कवड्या, एक डोळा असलेला नारळ मिळून आले आहे. त्यामुळे अघोरी प्रकार करण्यासाठी मांत्रिकाला तिची बहीण मदत करत होती का? म्हैसाळ हत्याकांडबाबत तिला माहिती होती का? या दृष्टीने तिच्याकडे तपास करण्यात येणार आहे. तसेच बहीण-भावाने अघोरी प्रकारातून किती माया जमवली आहे? वनमोरे यांच्याकडून किती रक्कम घेतली आहे, याची चौकशी मांत्रिकाच्या बहिणीकडे करण्यात येणार आहे.

मांत्रिकाने हत्याकांडमध्ये अत्यंत विषारी असलेल्या गोळ्यांचा वापर केला आहे. त्याने त्या गोळ्या कोठून आणल्या, या गोळ्या निर्माण करणारी कंपनी कोणती, ती कोठे आहे, कोणा मार्फत या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. याचा देखील तपास करण्यात येत आहे.
हत्याकांडमध्ये विषारी गोळ्यांची पूड करून त्याचे द्रव्य करण्यात आले. व ते नऊजणांना पाजण्यात आले होते. त्यामुळे विषारी गोळ्या निर्माण करणारी कंपनी आणि पुरवठादार हे दोघेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मांत्रिकाची बहीण हत्याकांड झाल्यापासून फरारी आहे. मांत्रिकाची बहीण आणि विषारी गोळ्या पुरवठा करणारा संबंधित या दोघांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आणखीन संशयितांची वाढ होण्याची शक्यता आहे.

इतक्या जालीम गोळ्या नेमक्या कसल्या?

अकराशे गहू मोजल्यानंतर गुप्तधन सापडेल, त्यासाठी बाटलीतील औषध प्यावे लागेल, असे सांगून मांत्रिकाने 9 जणांना 9 बाटल्यांतून विषारी गोळ्यांपासून बनवलेले द्रव्य पाजले होते. पोलिस त्या गोळ्यांचा सखोल तपास करीत आहेत. विषारी गोळ्या बनविणार्‍या कंपनीपर्यंत जाऊन तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Back to top button