मिरजेत 47 जणांना सव्वातीन कोटींना गंडा | पुढारी

मिरजेत 47 जणांना सव्वातीन कोटींना गंडा

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेत शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 25 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने समीर अख्तर हुसेन (वय 37, रा. तासगाव फाटा, मिरज) याने 47 जणांना 3 कोटी 36 लाख 65 हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी योगेश शांताराम घस्ते, राहुल वायदंडे यांच्यासह 47 जणांनी समीर हुसेन याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर हुसेन हा तासगाव फाटा येथे राहण्यास आहे. त्याने ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस ही शेअर मार्केटची कंपनी आहे. या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला 12 ते 25 टक्के इतका परतावा मिळतो. असे नफ्याचे आमिष दाखविले होते.त्यामुळे योगेश घस्ते यांच्यासह नातेवाईक आणि काही मित्र अशा 47 जणांकडून समीर हुसेन याने तब्बल 3 कोटी 36 लाख 65 हजार रुपये इतकी रक्‍कम गुंतवून घेतली होती.

पैसे देण्यास टाळाटाळ

पैसे गुंतविल्यानंतर गुंतवणूकदारांनी समीर हुसेन याच्याकडे परतावा देण्याची मागणी केली. परंतु हुसने याने परतावा देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काही जणांनी गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्याला देखील हुसेन टाळाटाळ सुरू केली होती. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्यासाठी हुसेन याला वारंवार फोन केला असता फोन उचलत नव्हता. त्यामुळे काही जणांनी घरी जाऊन पाहणी केली. तो घरी देखील सध्या वास्तव्यास नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शेअरमार्केटच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 25 टक्के इतका परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच पैसे न देता पसार झाल्याने 47 जणांनी त्याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button