सांगली: लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून युवा शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी

सांगली: लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

दिघांची; पुढारी वृत्तसेवा:  वयाची पस्तीशी होऊनदेखील लग्न होत नसल्याने नैराश्य येऊन येथील एका युवा शेतकर्‍याने शुक्रवारी (दि. 1) स्वतःच्या घरातील छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सचिन गंगाधर सावंत (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावंत हे गलाई व्यावसायिक म्हणून बाहेरच्या ठिकाणी काम करीत होते. काही दिवसांपूर्वी ते गावी परत आले होते. आई व भाऊ यांच्याबरोबर ते गावात राहत होते. गावात ते शेतीचे काम करू लागले. तसेच शेतमजूर म्हणूनही ते दुसर्‍याच्या शेतावर जात होते. वयाची पस्तीशी होऊनदेखील अद्याप लग्न झाले नव्हते. त्यामुळे त्यांना
नैराश्य आले होते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

या नैराश्यातूनच त्यांनी शनिवारी सकाळी घरात कोणी नसताना छताच्या अँगला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मित्र त्यांना फोन लावत होते. फोन उचलला जात नसल्याने मित्र घरी आले. त्यांना सचिन हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती पळसखेलचे पोलिस पाटील प्रकाश सावंत यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत आत्महत्येची नोंद झाली आहे.

Back to top button