सांगली: कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी | पुढारी

सांगली: कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी

पवाड; पुढारी वृत्तसेवा: कुपवाड – मिरज रस्त्यालगत असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील शिवशक्‍तीनगर भागातील आराध्या पांडुरंग जाधव या तीन वर्षाच्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी तिच्या तोंडाचे लचके तोडून गंभीर जखमी केले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच एका पिसाळलेल्या कुत्र्याने शिवशक्तीनगरमधील दहाजणांना चावा घेऊन जखमी केले.
शनिवारी सकाळी शिवशक्ती नगरमध्ये आराध्या अंगणात खेळत होती. त्यावेळी कुत्र्यांच्या कळपाने आराध्यावर हल्ला केला.

कुत्र्यांनी तिच्या तोंडाचे लचके तोडले. आराध्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजारील व्यक्तींनी धावत येऊन तिची सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रकाश ढंग यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेची डॉगव्हॅन शिवशक्तीनगरमध्ये येऊन भटकी कुत्री पकडण्याचा प्रयत्न केला. दोन- तीन कुत्री पकडली, मात्र डॉगव्हॅनची जाळी फाटलेली असल्याने पकडलेल्या कुत्र्यांनी जाळीतून पळ काढला.

शिवशक्तीनगर भागातील एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांना चावा घेतला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने एका घरात घुसून 80 वर्षाच्या वृध्दावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्या वृध्दाचे संरक्षण करून कुत्र्याला हुसकावून लावले. बाळू गवळी यांच्या म्हशीला चावा घेतला. तसेच साईराम गायकवाड, सिंधू कोळेकर यांच्यासह अनेक नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत.

Back to top button