सांगली: शासकीय जमिनीची अवैध विक्री; अधिकार्‍यांकडून डोळेझाक | पुढारी

सांगली: शासकीय जमिनीची अवैध विक्री; अधिकार्‍यांकडून डोळेझाक

सांगली; पुढारी वृत्तसेवा: कुपवाड येथील शासनाच्या मालकीच्या जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे पाडलेल्या प्लॉटची विक्री सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून उदासिनता दिसून येत असल्याने काहीजणांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या मालकीची कुपवाड येथील सुमारे साडेनऊ एकर जमीन 1931 मध्ये एका स्वातंत्र्य सैनिकांना भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. ती जमीन 1980 मध्ये महाराष्ट्र शासनाने जमा करून घेतली. त्या जमिनीवर शासनाचे नाव लागले होते.

आता या जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे प्लॉट्स पाडण्यात आले आहेत. यापैकी अनेक प्लॉटवर संबंधित प्लॉटधारकांची नावे लागली आहेत. भाजपाचे कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते व शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख गजानन मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक वर्षापूर्वी याबाबत पुराव्यासह तक्रार केली आहे. सहा महिन्यापूर्वी सांगलीच्या अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी जागेवर भेट दिली होती. तसेच पाहणी देखील केली होती.

या दरम्यान, त्यांना प्रथमदर्शनी काहीप्रमाणात तथ्य आढळले, पण त्यांच्या अधिकारांमध्ये मर्यादा असल्याचे सांगत प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी सर्वे अधिकारी, तलाठी व तक्रारदारांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर याबाबत अद्याप काहीच झालेले नाही.

Back to top button