सांगली: आष्ट्यात एकाची 93 हजारांची फसवणूक | पुढारी

सांगली: आष्ट्यात एकाची 93 हजारांची फसवणूक

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : बँकेच्या एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने कार्डाची अदलाबदली करून संजय भीमराव खोले यांची एका चोरट्याने 92 हजार 950 रुपये फसवणूक केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खोले हे बुधवारी येथील एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम कार्ड मशीनमध्ये घालते. परंतु पैसे येत नव्हते. यावेळी पाठीमागे उभा असलेल्या एका अनोळखी व्यक्‍तीने खोले यांना पैसे काढून देतो असे सांगितले. दरम्यान त्याने खोले यांच्या एटीएमची अदलाबदली केली. त्याने खोले यांना पिननंबर विचारून घेतला. त्यानंतर त्याने कार्ड मशीनमध्ये घातले. परंतु पैसे निघाले नाहीत. अनोळखी व्यक्‍ती व खोलेही दोघेही त्याठिकाणाहून निघून गेले.

त्यानंतर अनोळखी व्यक्‍तीने खोले यांच्या एटीएम कार्डचा वापर करून आष्टा येथील एटीएममधून चारवेळा दहा हजार याप्रमाणे 40 हजार रुपये, तसेच अन्य एटीएममधून 5 हजार 700, 5 हजार, 16 हजार, 15 हजार 950, व 10 हजार 300 रुपये असे एकूण 92 हजार 950 रुपये काढून घेऊन पसार झाला.

संजय खोले यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे मेसेज आल्यामुळे त्यांनी बँकेकडे तक्रार करून एटीएम कार्ड बंद केलेे. तसेच याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Back to top button