सांगली: मंत्रिपदाचं बाशिंग कोणाच्या माथी? | पुढारी

सांगली: मंत्रिपदाचं बाशिंग कोणाच्या माथी?

सांगली: सुनील कदम राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना बंडखोरांचे सरकार सत्तारूढ होणार आहे; पण सत्तांतराच्या या राजकारणात जिल्ह्यातील कुणाकुणाच्या माथ्यावर मंत्रिपदाचे बाशिंग बांधले जाणार, याची जिल्हाभरात उत्सुकता लागून राहिली आहे. त्या दृष्टिकोनातून बंडखोर गटाचे आ. अनिल बाबर आणि भाजपचे आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे व आ. गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आहेत.

आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे आणि आ. गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत

जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यातील अनिल बाबर यांचे नाव सर्वाधिक अग्रभागी आहे. कारण अन्य तीन नावांच्या तुलनेत आ. बाबर हे राजकीयद‍ृष्ट्या सर्वात ज्येष्ठ ठरतात. 1990, 1999, 2014 आणि 2019 असे चारवेळा ते खानापूरमधून निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेसमधून, त्यानंतर राष्ट्रवादीतून आणि 2014 व 2019 साली त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळविला आहे. आ. बाबर यांच्या राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून झाली, त्यानंतर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद ते थेट विधानसभा अशी बाबर यांच्या राजकारणाची कमान चढती राहिली आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्यांपैकी ते सर्वाधिक वरचढ ठरू शकतात.

याशिवाय बाबर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे शिवसेनेतील बंडाळीमध्ये बाबर यांनी पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे नव्या सत्तेची मोट बांधताना एकनाथ शिंदे यांना बाबर यांच्या नावाचा अग्रक्रमाने विचार करावा लागेल यात शंकाच नाही. बंडखोरांची संख्या आणि बंडखोर गटाच्या वाटणीला येणारी मंत्रिपदे याचाही विचार होण्याची शक्यता आहे. मात्र बाबर हे सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव बंडखोर आमदार असल्याची बाबही महत्वाची ठरणार आहे.
मंत्रिपदाच्या शर्यतीतील दुसरे महत्वाचे नाव म्हणजे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ! सांगली महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये सुधीर गाडगीळ यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.

ज्या सांगली नगरपालिका, महापालिकेत भाजपचे सदस्य नेहमी एका हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच असायचे, त्या ठिकाणी थेट भाजपची सत्ता आणण्याची किमया गाडगीळ यांनी आपल्या आमदारकीच्या दोन टर्ममध्ये करून दाखवली आहे. सांगली शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी गाडगीळ यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत 450 कोटीचा निधी आणला, त्यातून शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागली, हे कुणी नाकारू शकणार नाही. महत्वाची बाब म्हणजे आपल्या कारकिर्दीत गाडगीळ यांच्यावर कोणत्याही पध्दतीचा एकही शिंतोडा उडाला नाही की कुणी उडवू शकले नाही. गाडगीळांची ही स्वच्छ प्रतिमा आणि त्यांनी केलेली विकासकामे यामुळेच आज मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव घेतले जात आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात भाजपच्या राजकारणाचा पाया भक्कम करण्यासाठी भाजपचे नेते गाडगीळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचेही नाव चर्चेत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात खाडेंचाही मोलाचा वाटा आहे. दुसरी बाब म्हणजे भाजपच्या अन्य दोन आमदारांच्या तुलनेत खाडे हे राजकीयदृष्ट्या ज्येष्ठ ठरतात. कारण आमदारकीची त्यांची ही चौथी टर्म आहे. पहिल्यांदा जतमधून आणि त्यानंतर मिरजेतून सलग तीनवेळा खाडे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील शेवटच्या सत्रात खाडे हे मंत्रिपदाच्या मांडवाखालून जावून आले आहेत. खाडे हे काहीकाळ समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री होते. सलग चारवेळा विजय, राज्यमंत्रिपदाचा अनुभव आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठता या बाबी विचारात घेवून खाडे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.

मंत्रिपदाच्या शर्यतीतील आणखी एक नाव म्हणजे आ. गोपीचंद पडळकर! पडळकर यांना फडणवीस यांच्या अत्यंत विश्‍वासातील आणि आतल्या गोटातील समजले जाते. त्यामुळे विधानसभेला बारामती मतदारसंघातून पराभूत होवूनही फडणवीस यांनी पडळकरांना विधान परिषदेत पाठविलेच. शरद पवार, अजित पवार यांच्यासह झाडून सगळ्या भाजप विरोधकांना थेट भिडण्याची पडळकर यांची क्षमता त्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्यामुळे आणि धनगर समाजातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून भाजपकडून पडळकर यांना मंत्रिपदाच्या रूपाने ताकद दिली जावू शकते. या सगळ्या बाबी विचारात घेवून जिल्ह्यात मंत्रिपदाबाबत चर्चा आणि राजकीय ठोकताळे बांधले जात आहेत.

मात्र सत्तेच्या नव्या सारीपाटावर भाजपच्या वाट्याला किती मंत्रिपदे, राज्यमंत्रिपदे येणार आणि बंडखोरांना किती मंत्रिपदे, राज्यमंत्रिपदे मिळणार ही बाब अजूनतरी गुलदस्त्यात आहे. संख्याबळानुसार भाजपाला दोन तृतियांश आणि बंडखोरांना एक तृतियांश मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार बंडखोरांच्या वाट्याला कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून पंधरा ते सोळा मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडखोर आणि त्यांना मिळालेल्या अपक्षांची संख्या जवळपास पन्नासच्या घरात आहे. भाजपमध्येही इच्छकांची सगळी मांदियाळीच आहे. त्यामुळे मंत्रिपदे वाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. या कसरतीतून जिल्ह्यातील कुणाकुणाच्या माथ्याला मंत्रिपदाचे बाशिंग बांधले जाणार आणि कुणाकुणाची माथी फक्त संख्याबळ मोजण्यापुरतीच राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सदाभाऊ खोतांचं काय होणार!

मागील दोन वर्षांच्या काळात आपली भाजपनिष्ठा पदोपदी दाखवून देण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपली बरीच शक्ती खर्ची घातली. त्यानंतर पुन्हा विधान परिषद मिळविण्यासाठीही बरीच धडपड केली, पण त्यांच्या पदरात काही पडले नाही. नव्या सत्ता समिकरणातही सदाभाऊंच्या हाताला लागण्यासारखं सध्यातरी फारसं काही दिसत नाही. मिळालं तर एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना लाभू शकते. अन्यथा त्यांची रयत क्रांती संघटना आणि आंदोलने आहेतच!

जयंतराव विरोधी पक्षनेते?

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आमदारांच्या संख्याबळानुसार 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडेच विरोधी पक्षनेतेपद जाते. त्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडे असलेली राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी विचारात घेता विरोधी पक्षनेता हे पद अजित पवार, धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीतील अन्य कुणा वजनदार नेत्यांकडे सोपविले जाण्याचीही शक्यता आहे.

इतना सन्‍नाटा क्यू हैं भाई!

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यातील सत्तेची त्यांनी कल्पनासुध्दा केली नव्हती. मात्र खा. शरद पवार आणि खा. संजय राऊत यांच्या करामतीमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही या सत्तेची बरेच फळे चाखली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

Back to top button