सांगली: लैंगिक अत्याचार प्रकरणी मिरजेतील तरुणाला 10 वर्षे सक्‍तमजुरी | पुढारी

सांगली: लैंगिक अत्याचार प्रकरणी मिरजेतील तरुणाला 10 वर्षे सक्‍तमजुरी

सांगली: पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रवीण सुरेश सुन्नके (वय 26, रा. मालगाव वेस, मिरज) याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे यांनी काम पाहिले.

आरोपी प्रवीण हा पीडित मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देत होता. पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांकडे याबाबत तक्रार केली होती. आई-वडिलांनी प्रवीणला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. याचा गैरफायदा घेऊन त्याने पीडित मुलीला दुचाकीवरून पुणे येथे पळवून नेले. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रवीणने पुण्यातील कात्रजमध्ये खोली भाड्याने घेतली. दि. 27 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2016 या काळात त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांना आरोपी प्रवीणचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी त्याला दि. 14 नोव्हेंबर 2016 रोजी ताब्यात घेतले. हवालदार वंदना मिसाळ, सहाय्यक फौजदार गणेश वाघ, एस. एन. पाटील यांनी सरकार पक्षाला मदत केली.

Back to top button