सांगली: दोनशे भर कामांच्या फाईल रखडल्या | पुढारी

सांगली: दोनशे भर कामांच्या फाईल रखडल्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडील दोनशेहून अधिक कामांच्या फाईली रखडल्या आहेत. कामांच्या निविदा निघाल्या आहेत, पण पुढील कार्यादेशापर्यंतची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे महापालिकेचे सर्वपक्षीय पदाधिकारी शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांना भेटणार आहे. विशेष शिबिर घेऊन कामे मार्गी लावण्याची मागणी करणार आहेत.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान हे शुक्रवारी आयुक्त कापडणीस यांची भेट घेणार आहेत. त्यासंदर्भात गुरुवारी महापालिकेत चर्चा झाली.

महानगरपालिकेची महासभा दि. 20 जून रोजी झाली. या महासभेत रखडलेल्या कामांवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी केली होती. जिल्हा नियोजन समितीकडील वार्षिक योजनेतील कामे, समाजकल्याण समिती निधी कामे तसेच नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतील कामे रखडली आहेत. या कामांच्या निविदा ओपन केल्या आहेत. मात्र समज देणे, कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यापर्यंतची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.

विशेष शिबिर घेऊन एकाच दिवशी या फाईलचा निपटारा करावा, अशी मागणी महासभेत झाली होती. दरम्यान, आयुक्त कापडणीस यांनी शिबिर घेण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने सर्व पदाधिकारी आयुक्त कापडणीस यांना भेटणार आहेत. संबंधित सर्व विभागांना कडक सूचना देऊन फाईलींचा निपटारा करावा, अशी मागणी करणार आहेत.

Back to top button