स्वार्थ आणि सत्तेसाठी पळून जाणाऱ्यांनी टेंभूच्या नावावर लोकांना मूर्ख बनवू नये : वैभव पाटील | पुढारी

स्वार्थ आणि सत्तेसाठी पळून जाणाऱ्यांनी टेंभूच्या नावावर लोकांना मूर्ख बनवू नये : वैभव पाटील

विटा : पुढारी वृत्तसेवा : स्वार्थ आणि सत्तेसाठी अंधारात पळून जाऊन लपून बसलेल्यानी टेंभू आणि विट्याच्या पाण्या च्या नावावर लोकांना मूर्ख बनवू नये अशी घणाघाती टीका विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांच्यावर केली. मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, असे पत्रकारांना खानापूर आटपाडीचे आमदार अनिलराव बाबर यांनी सांगितले होते.

त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी म्हंटले आहे की, तुमचा इतिहास तपासला तर खानापूर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा विश्वासघात करुन तुम्ही काँग्रेस,राष्ट्रवादी आणि आत्ता शिवसेना या पक्षांचा स्वार्थासाठी पुरेपूर वापर करुन घेतला.  शिवाय या सर्व पक्षांचा, पक्ष नेतृत्वांचा आणि मतदारसंघाचा विश्वासघात करुन प्रत्येक वेळी अंधारात पक्ष बदल केला. गेल्या काही वर्षात शिवसेनेबरोबर सत्तेत राहुन दुसऱ्याच पक्षाबरोबर असलेला तुमचा वावर लोकांपासून लपून राहिलेला नाही.आत्तासुद्धा ज्या पक्ष नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांना धोका देऊन, विश्वासघाताने गद्दारी करुन मतदारसंघातील जनतेला अंधारात ठेऊन केवळ स्वार्थासाठी पळुन गेला आहात,असा आराेप त्‍यांनी केला.

लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी या गद्दारीला टेंभू आणि विट्याच्या पाण्याचे नांव देऊन नेहमी प्रमाणे लोकांना मूर्खात काढू नका. लोक आता सुज्ञ झालेत हे विसरु नका. टेंभूचे आजपर्यंत झालेले प्रचंड काम हे गेल्या २५-३० वर्षातील सर्वच आमदार तसेच बाजूच्या मतदारसंघातील आमदार, मंत्रीमहोदय या सर्वांच्या योगदानाने झाले आहे . विद्यमान महाविकास आघाडीशासन आणि जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी मतदारसंघांतील वंचित गावांचा टेंभूमध्ये समावेश करुन मतदारसंघाला न्याय दिला आहे. विट्याच्या पाण्याचे तर तुम्ही नांवच घेऊ नका, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या प्रयत्नाने विटा शहराची ३२ कोटी रुपयां ची नवीन पाणी योजना पुर्णत्वाला आली असून येणाऱ्या दोन -तीन आठवड्यात ती कार्यान्वीत होत आहे.

तसेच शहराची भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त योजना आणि निधी मंजूरीसाठी ना.अजित पवार आणि ना.जयंतराव पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत, हे विसरु नका. त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्यासाठी आणि आपली गद्दारी झाकण्यासाठी टेंभूचा आणि विटा शहराच्या पाण्याचा वापर करु नका. खरं तर खानापूर मतदारसंघातील विटा शहर देशपातळीवर स्वच्छतेचे अँम्बेसेडॅार म्हणुन अभिमानास्पद प्रतिष्ठा मिळवत असतानाही खानापूरचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे विश्वासघाताचा अँम्बेसेडॅार ठरत असल्याची खंत आज इथल्या जनतेच्या मनांत निर्माण झाली आहे असा टोलाही, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार बाबर यांना लगावला आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button