सांगली : गुन्ह्यात मदतीसाठी लाच; दोघांना अटक | पुढारी

सांगली : गुन्ह्यात मदतीसाठी लाच; दोघांना अटक

सांगली/पलूस : पुढारी वृत्तसेवा
पलूस येथे एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला मदत करण्याच्या कारणावरून 80 हजार रुपयांची लाच घेणार्‍या व त्याला प्रोत्साहन देणार्‍या अशा दोघांना अटक करण्यात आली. समीर शमशुद्दीन मुल्ला (वय 43, रा. पलूस), सचिन संपत औटे (40, रा. कुंडल) अशी या संशयितांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पलूस पोलिस ठाणे येथे फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांचे भाऊ अटकेत आहेत. त्यांना याप्रकरणी सहकार्य करण्याकरिता मुल्ला याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 व 20 जूनला पडताळणी केली. मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे पोलिस अधिकारी यांच्याकरिता लाचेची मागणी केली. चर्चेतून 80 हजार रुपये ठरले व लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, 21 जून रोजी  लाचलुचपत विभागाने पलूस येथील नवीन बसस्थानकाजवळ सापळा लावला. यावेळी मुल्ला याने तक्रारदारांकडून 80 हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याशिवाय औटे याने मुल्ला याला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

Back to top button