सांगली : पैशांच्या पावसाच्या अमिषाने १५ लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : पैशांच्या पावसाच्या अमिषाने १५ लाखांचा गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सुनील मोतीलाल व्हटकर (वय 57, रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांना पंधरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीतील बादशहा पाथरवट याच्यासह सात जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बादशहा पाथरवट (वय 35), त्याची पत्नी आसमा (30) दोघे रा. खणभाग, सांगली), शिवानंद शरणाप्पा हाचंगे (60, विडी घरकुल, सोलापूर), शंकर जाधव (40, पत्ता नाही) व तीन अनोळखी (अजून नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयित शंकर जाधव हा महाराज आहे. सुनील व्हटकर हे सोलापुरात शेती करतात. कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी महाराज जाधव याची भेट घेतली. जाधवने कौटुंबिक अडचणीवर काही उपाय सांगितले. तसेच पैशांची अडचण असेल तर सांगा, तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देतो’, असे सांगितले. व्हटकर तयार झाले. यासाठी जाधवने त्यांना 25 लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. चर्चेअंती 15 लाख रुपये देण्याचे व्हटकर यांनी मान्य केले.

जाधवने ‘मी अनेकांना पैशांचा पाऊस पाडून दिला आहे’, असेही सांगितले. त्यानंतर सांगलीत बादशहा पाथरवट याच्याशी मोबाईलवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. पाथरवट यानेही व्हटकर यांना ‘मला महाराजांनी पैशांचा पाऊस पाडून दिल्याचे सांगून व्हटकर यांचा विश्‍वास संपादन केला. गेल्या महिन्यात पाथरवटने व्हटकर यांना सांगलीत बोलावून घेतले.

व्हटकर 15 मे रोजी सांगलीत आले. तेथून त्यांना अंकली (ता. मिरज) येथील फाट्यावर नेण्यात आले. यावेळी सर्व संशयित होते. पण महाराज जाधव हा मात्र नव्हता. संशयितांनी तिथे व्हटकर यांच्याकडून 15 लाखांची रोकड घेतली. त्यानंतर त्यांना खणभागात पाथरवट याच्या इलेक्ट्रिक गोडाऊनमध्ये नेण्यात आले. तिथेच पैशांचा पाऊस पाडण्यासाठी महाराज येणार असल्याचे सांगितले. याठिकाणी जडीबुटी व पूजेसाठी लागणारे साहित्यही व्हटकर यांच्यासमोर ठेवण्यात आले.

संशयितांनी जाधवला संपर्क साधला. पण त्याचा मोबाईल बंद लागत होता. यावर संशयितांनी व्हटकर यांना महाराज आपल्याला फसवत असल्याचे सांगितले. व्हटकर सोलापूरला निघून गेले. ते पाथरवटशी संपर्क साधत होते. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच जाधवही गायब झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्हटकर यांनी मंगळवारी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड तपास करीत आहेत.

Back to top button